PM Modi Visit To Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्यात निवडणुकीचे रणशिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM narendra Modi Visit To Mumbai bkc bjp shinde election  politics

PM Modi Visit To Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्यात निवडणुकीचे रणशिंग

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. बीकेसी येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. मोदी यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावले होते होती. ‘बेस्ट’च्या बसमधून भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ‘बीकेसी’त दाखल झाले. परिणामी बेस्टच्या दैनंदिन बससेवेवरही मोठा परिणाम झाला होता.

त्याशिवाय बाहेरगावाहून शेकडो कार्यकर्ते खासगी बसगाड्यांमधून दाखल झाले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकप्रकारे मोदींच्या सभेनिमित्त मोठे शक्तिप्रदर्शन केले.

फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांसाठी कर्ज वितरणाच्या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. फेरीवाल्यांनी त्यासाठी गर्दी केल्याने त्यांच्यासाठी सभेच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती.

धन्यवाद मोदीजी..!

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत असल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘धन्यवाद मोदीजी’ असे हजारो फलक सभास्थळी आणले होते. ‘विकासपुरूष मोदीजी’ असे फलक झळकावून धन्यवाद मानले जात होते. मोदींना पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही सहभाग होता.

क्षणचित्रे

  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

  • ढोलताशे व लेझीम पथकासह दक्षिण भारतीय संस्कृती आणि कलाकारांचे सादरीकरण

  • गुंदवली मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेताना पंतप्रधानांनी प्रवाशांशी संवाद साधला