वायकरांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातच घुसला, भाजपने उडवली वायकरांची टर

वायकरांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातच घुसला, भाजपने उडवली वायकरांची टर

मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्यातील सत्य बाहेर काढावे यासाठी पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार करणारे शिवसेनेचे माजी मंत्री रविंद्र वायकर यांनी यापुढेही असेच घोटाळे उघड करून जनसेवा करावी, अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी वायकर यांची टर उडवली आहे. 

पीएमसी बँक प्रकरण आता शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी वायकर यांचे उपरोधिक शब्दांत अभिनंदन केले आहे. तर काही नेत्यांनी वायकर यांची यथेच्छ खिल्लीही उडवली आहे. 

या प्रकरणी वायकर यांनी केंद्रात बराच पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणात पैसे अडकलेल्या सामान्य लोकांसाठी वेगाने कारवाई व्हावी, अशा आशयाची पत्रेही त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत सर्वांना लिहिली होती. त्यांच्याच पत्रामुळे केंद्रीय यंत्रणांनी वेगाने कारवाई केली आणि आता तपास यंत्रणांनी राऊत कुटुंबियांभोवती फास आवळला, असेही भाजप नेते उपरोधिकपणे दाखवून देत आहेत. 

वायकर यांनी या विषयावर अनेक पत्रे लिहून ती जनतेसमोर उघडही केली होती. वायकर यांच्याच पाठपुराव्यामुळे आता या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तर त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या 72 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरही ईडीने नुकतीच टाच आणली आहे. वायकर यांच्याच पत्रांमुळे पीएमसी बँकेतील सामान्य खातेदारांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढेही सामान्य खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी वायकर यांनी असेच प्रयत्न करावेत, असा टोमणा भातखळकर यांनी मारला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
  
यापुढे पीएमसी बँक प्रकरणी वायकर कोणते पत्र कोणाला लिहिणार याची प्रचंड उत्सुक्तता जनतेला लागून राहिली आहे, अशी उपरोधिक स्तुतीही भातखळकर यांनी केली आहे. अशा मित्रांपेक्षा आमच्यासारखे उघड राजकीय वैरी परवडले अशीच आता इतर घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या सेना नेत्यांची अवस्था होईल. असेच अन्य विषयांवरील घोटाळे उघड करण्यासाठीही वायकरांना आमच्या शुभेच्छा. यापुढे अशा प्रकरणात आपल्याच पक्षाचा कोणी नेता अडकला नाही ना याचीही त्यांनी आधीच खातरजमा करून घ्यावी, अशा शब्दांत भातखळकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. 

बाण धनुष्यातच घुसला

या प्रकरणात राजकीय नेते गुंतले असतील असा कयास वायकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून वर्तविला होता. वायकर यांचा तो अंदाज खराच ठरला, फक्त वायकर यांचा नेम चुकला आणि त्यांचा बाण धनुष्यातच घुसला. करायला गेले एक अन झाले भलतेच, अशी वायकर यांची अवस्था झाल्याची गंमतीदार टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

PMC bank Scam BJP leader Atul Bhatkhalkar raillery Shivsena leader ravindra raikar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com