कोरोना महामारीतही विकृतीदर्शन; पोलिसांनी उचलला कारवाईचा दंडुका 

कोरोना महामारीतही विकृतीदर्शन; पोलिसांनी उचलला कारवाईचा दंडुका 

मुंबई : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असताना काही समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांनी समाज माध्यमांवरील कोरोनाविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्या 600 पोस्ट हटवल्या असून, पाच गुन्हे दाखल केले आहेत. राज्य सायबर विभागानेही अशा 60 पोस्ट हटवून 115 जणांना अटक केली आहे. 
   
सायबर विभाग सर्व जिल्हा पोलिसांशी समन्वय साधून गुन्हेगारी प्रवृत्ती व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवरील गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 ची सोशल मीडिया लॅबही अशा आक्षेपार्ह पोस्टवर लपडताळणी करत आहे.

अशा 550 आक्षेपार्ह पोस्ट आतापर्यंत हटवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांत खोटी माहिती पसरवणारे व्हिडीओ, कोरोनाबाबत खोटी माहिती, समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रक्षोभक मजकुराचा समावेश आहे.  

प्रक्षोभक पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी विशेष शाखेतील पोलिसांचे पथक सतत तपासणी करत असते. हे प्रशिक्षित पथक अद्ययावत सॉफ्टवेअर, फिल्टर व टुल्सनी सज्ज आहे.

परंतु, इंटरनेटचे जाळे एवढे मोठे आहे, की प्रत्येक संदेश, व्हिडीओवर लक्ष ठेवणे शक्‍य होत नाही. एखाद्या छोट्या संदेशामुळेही जनभावना दुखावल्यास वाद उद्भवू शकतात. त्यामुळे 30 पोलिसांचे हे पथक तीन पाळ्यांमध्ये 24 तास काम करते. 

फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम आदी समाज माध्यमांवरील संदेशांची विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी केली जाते. एखादा आक्षेपार्ह संदेश सापडल्यास तात्काळ सेवापुरवठादार कंपनीशी संपर्क साधून तो ब्लॉक करण्यात येतो.

कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआयटी), दहशतवाद विरोधी पथके व इतर सुरक्षा यंत्रणांमार्फत या पथकाला नियमित प्रशिक्षण दिले जाते. इंटरनेटवरवरील नवे तंत्रज्ञान व दहशतवादी वापरत असलेल्या नव्या संकल्पनांची माहिती देण्यात येते. 

राज्य सायबर विभागाची कठोर कारवाई
समाज माध्यमांवरून अफवा पसरवण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सायबर विभागाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधित ग्रुपच्या अॅडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राज्य सायबर पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी स्पष्ट केले होते. अशा प्रकरणांत 307 गुन्हे दाखल झाले असून, प्रक्षोभक व्हिडीओसंदर्भात 115 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कोरोनाबाबत अफवा पसरवणारे 75 प्रकार आणि चुकीची माहिती देण्याचे 24 प्रकार उघड झाले आहेत. राज्य सायबर विभागाने 60 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या असून, 115 जणांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com