अखेर दंडुकेशाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

सोमवारपासून राज्य सरकारने जमावबंदी लागू केली असली, तरी ती ठिकठिकाणी झुगारलेली दिसली. विशेषत: अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने पोलिसांना "दंडुकेशाही'चा वापर करावा लागला. 

सकाळ वृत्तसेवा 
अलिबाग ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या "जनता संचारबंदी'ला नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर सोमवारपासून राज्य सरकारने जमावबंदी लागू केली असली, तरी ती ठिकठिकाणी झुगारलेली दिसली. विशेषत: अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने पोलिसांना "दंडुकेशाही'चा वापर करावा लागला. 

अखेर सक्तीची बंदी 
अलिबाग, रोहा, पेण, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये सकाळीच नागरिकांनी भाजी, किराणा सामान विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे बहुतांश बाजारपेठांमधील वर्दळ नेहमीप्रमाणे वाटत होती. जीवनाश्‍यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्याकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केले होते. गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांना इतर दुकाने सक्तीने बंद करण्याच्या सूचना द्याव्या लागल्या, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली. 

 हे वाचा : झोपडपट्टीमध्ये कोरोना?
अलिबाग एसटी आगरातून होणारी सार्वजनिक वाहतूक सेवेच्या 70 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर जलवाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली. अलिबाग शहरात येणाऱ्या खासगी वाहनांची संख्यादेखील खूपच कमी आहे. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले. एसटी, रेल्वे वाहतूक बंद असल्याने माणगाव, तळा येथील चाकरमानी खासगी बसद्वारे गावाकडे येत आहेत. मुंबई

नोकरदारांच्या तपासण्या 
मुंबईतून गावाकडे येणाऱ्या नागरिकांनी वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात, त्यानंतर गावात प्रवेश करावा, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिल्या आहेत. रविवारप्रमाणेच 31 तारखेपर्यंत नागरिकांनी संयम पाळणे आवश्‍यक असल्याचे आवाहन येथील लोकप्रतिनिधींनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police is finally aggressive

टॉपिकस
Topic Tags: