esakal | पोलिस आयुक्तांचा आक्षेप तरी २२ लाखाची लाच घेतलेला PI पुन्हा सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्तांचा आक्षेप तरी २२ लाखांची लाच घेतलेला PI पुन्हा सेवेत

1 जानेवारी 2019 रोजी दारु दुकान मालकाकडून 22 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

पोलिस आयुक्तांचा आक्षेप तरी २२ लाखांची लाच घेतलेला PI पुन्हा सेवेत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - पोलिस दलातून 2019 मध्ये बडतर्फ करण्यात आलेले पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. 2019 मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. सेवेत घेण्यासाठी 2019 मध्ये भाजप सेनेचं सरकार असताना सुरुवात केली होती. मात्र काही कारणांनी ही प्रक्रिया थांबली होती. मे महिन्यात याबाबत हालचाली झाल्या आणि भोईर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं.

आनंद भोईर हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांना 1 जानेवारी 2019 रोजी दारु दुकान मालकाकडून 22 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. भोईर यांनी अंधेरीच्या जेबी नगर येथील गोदामात छापा टाकला होता आणि 16.3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. तसंच त्यांनी एकाला अटकही केली होती. यात त्याने अशोक पटेल यांना गोवण्याची धमकी दिली होती.

पटेल यांची अटक टाळण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी भोईर यांनी केली होती. याबाबत पटेल यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर 22 लाखांची लाच घेताना भोईर यांना अटक केली होती. लाच प्रकरण अद्याप एसीबी न्यायालयात प्रलंबित आहे.

हेही वाचा: Maharashtra Unlock : राज्यातील निर्बंध शिथिल होणार?

सप्टेंबर 2019 मध्ये पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी भोईर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. चौकशीमध्ये भोईर दोषी आढळले होते. त्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्र्यांकडे आनंद भोईर यांनी धाव घेतली. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देत पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश दिले. याला पोलिस आयुक्तांनी आक्षेप घेतल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी स्वत:च्या आदेशाला स्थगिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भोईर यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. भोईर यांच्या प्रकरणाची पुन्हा समीक्षा करण्यात आली आणि स्थगिती उठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा: गर्दी वाढल्यास निर्बंध कठोर करा, केंद्राचे राज्यांना नवे आदेश

आरोपींना वाचवण्यासाठी भोईरने पैसे मागितल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यानतंर भोईर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. त्यानंतर भोईर यांनी गृह विभागाकडे पुन्हा सेवेत घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. यात भोईर यांनी म्हटलं की, लाच घेताना अनेक सरकारी कर्मचारी पकडले गेले आहेत आणि त्या सर्वांनाच सेवेतून काढून टाकता येत नाही. तसंच लाच घेतली हे सेवेतून काढण्यासाठीचे कारण असू शकत नाही. मला बेकायदेशीर सेवेतून काढून टाकलं आहे असा आरोप करताना भोईर यांनी आपण संवेदनशिल प्रकरणांचा तपास केला असून काम चांगलं असल्याचंही म्हटलं आहे.

सध्या भोईर यांची नियुक्ती पूर्व विभागातील कंट्रोल रूममध्ये करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर पोलिस सहआयुक्त राजकुमार वाटकर यांनी सांगितलं की, राज्याच्या गृह विभागाच्या आदेशावरून भोईर यांना सेवेत घेण्यात आलं आहे. याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

loading image