
या धक्कादायक बातमीमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
धाड टाकलेल्या घरात आढळली ३० कोटींची रोकड, ६ कोटींवर पोलिसांचा डल्ला?
ठाण्यातील मुंब्रा येथील एका घरात टाकलेल्या छाप्यात तब्ब्ल ३० कोटींची रोकड आढळून आली आहे. मात्र त्यातील सहा कोटी रुपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याची लेखी तक्रार ठाणे पोलिसांकडे (Thane Police) आली आहे. या धक्कादायक बातमीमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी सांगितले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज व्हायरल झाला असून अर्जावर २५ एप्रिलची तारीख आहे.
हेही वाचा: माझ्या पक्षातील लोकांची दोन मतं, शरद पवार निवडणुकांवर स्पष्टच बोलले
मिळालेली माहिती अशी की, १२ एप्रिलच्या मध्यरात्री मुंब्रा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींना सोबत घेऊन मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीतील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला. यावेळी घरात ३० कोटी रुपये होते. हे पैसे पोलिस ठाण्यात आणले. नंतर या व्यक्तीला पोलिसांनी खडसावले. यातील काही पैसे देण्याची मागणी छाप्यात सहभागी असलेल्यांनी केली. यावर ही व्यक्ती दोन कोटी रुपये देण्यास तयार झाली. परंतु त्याला ३० कोटींपैकी २४ कोटी रुपये परत करण्यात आले. सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले. एवढे पैसे कसे का घेतले, अशी विचारणा या व्यक्तीने केल्यावर एका पोलिसाने त्याला हाकलून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. सहा कोटींची लूट केल्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रारदाराने केली. जास्त पैसे घेतल्यावरून पोलिस आणि अन्य एक व्यक्ती यांच्यात भांडण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असली, तरी या अर्जावर पोलिसांची सही आणि शिक्का नाही. परंतु, हा प्रकार घडल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकाराविषयी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांना विचारले असता, याबाबत चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून तक्रार अर्जाची शहनिशा केली जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा: कृपा शंकर सिंह यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती
Web Title: Police Raid In Thane Found Rupees 30 Crore Out 6 Crore From Police Hand Possibility
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..