मोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'

Prime-Minister-Narendra-Modi-770x435.jpg
Prime-Minister-Narendra-Modi-770x435.jpg
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा महिन्यावर केंद्रातील निवडणुका आल्याने पुन्हा एकदा लोकांच्या भावनेला हात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ''तुम्ही लोकांना एकदाच मूर्ख बनवू शकता नेहमी नाही'' अशा शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी भाजपच्या नाकर्तेपणावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ''ही मेट्रो नाही, तर बिल्डरांसाठी तयार करण्यात येणारी 'बिल्ट्रो' आहे'' अशी टीका केली आहे.

18 डिसेंबरला कल्याण मेट्रो मार्ग पाच तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोमार्फत बांधण्यात येणाऱ्या 90 हजार घरांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते हे भूमिपूजन होत असल्याने भारतीय जनता पक्ष तसेच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. याच अंतर्गत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेऊन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरिक उपस्थित राहतील यासाठी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही पालिका आयुक्त गोविंद बोडके तसेच अन्य  अधिकाऱ्यांसह फडके मैदानाची पाहणी केली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमास नागरिकांप्रमाणेच नेत्यांची गर्दी होणार असल्याने या ठिकाणी दोन व्यासपीठ उभारण्यात येणार असल्याचे समजते. 

पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमामुळे भाजपमध्ये जरी उत्साहाचे वातावरण आहे. विरोधात असलेल्या मनसे आणि काँग्रेसने मात्र या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी नरेंद्र मोदी यांना संबोधून 'मेट्रो फॉर डोंबिवली' असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ''भिवंडी कल्याण मेट्रो ही सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांसाठी फायद्याची नसून ती केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे.'' ,अशी टीका कदम यांनी केली आहे. त्यामुळेच ही मेट्रो नाही तर 'बिल्ट्रो' आहे, असे कदम यांनी म्हटले आहे. ''रेल्वेतून प्रवास करताना आपला जीव गमवावा लागणाऱ्या  सर्वसामान्य नागरिकांना अंबरनाथ, बदलापूर, कल्याण या परिसराला जोडणाऱ्या मेट्रोची गरज आहे. भिवंडी कल्याण मेट्रोमुळे सर्वसामान्य नागरिकाला खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही'', असे मत कदम यांनी मांडले आहे.

काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनीही साडे चार वर्षातील भाजपा सरकारच्या निष्क्रिय कारभारावर टीका केली.  2014 पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रो मार्गाचे आराखडे तयार केले होते. विद्यमान सरकारने जर त्यावर काम केले असते तर चार वर्षात हे काम पूर्णत्वाकडे आले असते. मेट्रोची मुहूर्तमेढ काँग्रेस सरकारच्या काळातच रोवली गेली होती आणि त्याचे उद्घाटन आहे भविष्यात काँग्रेस सरकारच करेल असा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला उत्तर भारतातील निवडणूक निकालांचा कल लक्षात घेता राज्यातही पुढील वर्षी काँग्रेसचेच सरकार येणार असा आशावाद पोटे यांनी मांडला.

मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही मोदींच्या या दौऱ्यामुळे खळबळ माजली आहे. श्रेयवादासाठी कायमच या दोन्ही पक्षात लढाई होत असते. मेट्रो प्रकल्पाच्या कामांचे श्रेय घेत भाजप आपली परंपरा पाळणार अशी कुजबूज सेनेच्या गोटात आहे. ज्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल तेवढेच कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी भूमिका सेनेकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमास येतील अशी आशा आहे. मात्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमात कितपत स्थान मिळणार याबाबत अनभिज्ञता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com