esakal | वर्षा गायकवाडांचे काम केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भाजपनेत्याची घणाघाती टीका

बोलून बातमी शोधा

वर्षा गायकवाडांचे काम केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भाजपनेत्याची घणाघाती टीका

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या केवळ शिक्षण सम्राटांकरिताच काम करीत असल्याची बोचरी टीका भाजप नेत्याने केली आहे.

वर्षा गायकवाडांचे काम केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भाजपनेत्याची घणाघाती टीका
sakal_logo
By
कृष्ण जोशी


मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये केवळ निम्मेच शालेय शुल्क आकारले जात असताना महाराष्ट्रात पूर्ण वसुली का केली जात आहे, असा प्रश्न भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या केवळ शिक्षण सम्राटांकरिताच काम करीत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. 

कोरोनाच्या फैलावामुळे बहुतांश शाळा बंद असतानासुद्धा खाजगी शिक्षण संस्थांकडून बस फी, लॅब फी, टर्म फी, उपक्रम फी, जिम फी, क्रीडा फी, शालेय फी यांची सक्तीने वसुली केली जात आहे. फी न दिल्यास विद्यार्थांना परीक्षेस बसू न देण्याची धमकी दिली जात आहे. अशा शिक्षण संस्थांना ताकीद देण्याचे सोडून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पालक संघटनांवरच खोटे आरोप करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत. शिक्षणमंत्री हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणे सोडून केवळ शिक्षण सम्राटांच्या फायद्यासाठीच काम करीत आहेत, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनी तेथील कायद्यात सुधारणा करून विद्यार्थांना शालेय शुल्कात 50 टक्यांपेक्षा अधिकची सुट दिली आहे. महाराष्ट्राने सुद्धा राज्यातील विद्यार्थांना शाळांच्या फी मध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी मी स्वतः, भाजपने तसेच पालक संघटनांनी सतत केली होती. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शुल्क (विनियमन) अधिनियम 2011 मध्ये सुधारणा न करता केवळ एक शासन निर्णय काढण्याचा देखावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला. या शासन निर्णया विरुद्ध न्यायालयात गेलेल्या संस्था या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संबंधितच आहेत, यातून या सरकारची व शिक्षण सम्राटांची हातमिळवणी उघड होत आहे. अशा परिस्थितीतही कायद्यात सुधारणा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात आंदोलन करणाऱ्या पालक संघटनांच्या विरोधात प्रसिद्धीपत्रक काढून त्यांच्यावर दबाब टाकण्याचा संतापजनक प्रकार शिक्षणमंत्र्यांकडून केला जात आहे. यातून शालेय शिक्षण मंत्र्यांचा ढोंगीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून शिक्षण सम्राटांच्या सोबत आर्थिक हातमिळवणी करून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम शिक्षणमंत्र्यांकडून केले जात आहे, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तात्काळ शालेय फी मध्ये 50 टक्के सवलत देण्यासंदर्भात पुढील आठ दिवसांत वटहुकूम काढावा अन्यथा भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

political latest marathi Varsha Gaikwads work is only for education emperors politics atul Bhatkhalkar