राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपकडून टीकेची झोड; CBI चौकशीची मागणी

कृष्ण जोशी
Tuesday, 23 February 2021

पूजा चव्हाण प्रकरणी संशयाची सुई असलेले मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे

मुंबई - पूजा चव्हाण प्रकरणी संशयाची सुई असलेले मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हे शक्तीप्रदर्शन पाहता मुख्यमंत्री बोलत असलेली निष्पक्ष चौकशी होईल का, अशी शंका आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

इतके दिवस गायब असलेले मंत्री आज एकाएकी हजर होऊ एवढे शक्तीप्रदर्शन कसे करतात. शक्तीप्रदर्शनाबरोबरच यावेळी राठोड यांच्या समर्थकांनी कोरोनाविषयक सर्व नियम पायदळी तुडवून गर्दी केली, असाही आक्षेप भाजप नेत्यांनी घेतला आहे. याप्रकरणी चौकशी होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरीही हे शक्तीप्रदर्शन पाहता निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही लाड यांनी ट्वीट द्वारे केली आहे.  

सकाळी हे शक्तीप्रदर्शन सुरु असताना तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून कोरोनाविषयक नियम मोडल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली. राठोड राजिनामा देऊन निर्दोषित्व सिद्ध होईपर्यंत पुन्हा मंत्रीपद स्वीकारणार नाहीत, असे वाटले होते. मात्र सत्ता हीच आपले संरक्षण करू शकते, याची जाणीव असल्याने त्यांनी फक्त नाटक केले, अशी खरमरीत टीका दरेकर यांनी केली. या प्रकरणामुळे कुटुंबाला व समाजाला दुःख होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, पण आज महाराष्ट्राच्या समाजमनाला दुःख होत आहे. राज्यातील तरुणी व महिला यांना होत असलेल्या मानसिक यातनांची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असेही दरेकर म्हणाले. 

आत्महत्या प्रकरणी संशय असलेले मंत्री पंधरा दिवस गायब असूनही मुख्यमंत्री गप्प होते. पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत या मंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. आता सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, पण या शक्तीप्रदर्शनात किमान मास्क न लावल्याचा गुन्हा तरी मुख्यमंत्री नोंदवतील का, अशा शब्दांत भाजप चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे.

--------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political marathi update BJP criticizes sanjay rathod Demand for CBI inquiry pooja chavhan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi update BJP criticizes sanjay rathod Demand for CBI inquiry pooja chavhan