मुंबई, नवी मुंबईचे प्रदूषण, एका दिवसात निम्म्याने घटले... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाल्याचा परिणाम

मुंबई : कोरोनाच्या प्रसारावर शनिवारपासून (ता. 21) महामुंबईत अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांचा सकारात्मक परिणाम मुंबई आणि नवी मुंबईच्या प्रदूषणाच्या पातळीवर होत आहे. दोन्ही शहरांतील प्रदूषणाची पातळी 24 तासांत निम्म्याने खाली आली आहे. 

WhatsApp वर मिळवा COVID19 ची अधिकृत माहिती, सुरु झालाय चॅटबॉक्स..

भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या सफर उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. 20) नवी मुंबईत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण हवेच्या प्रत्येक घनमीटरमध्ये 303 मायक्रोग्रॅम इतके नोंदवण्यात आले होते. ही हवा श्‍वास घेण्यासाठी धोकादायक होती. तेच प्रमाण शनिवारी 126 मिलिग्रॅमपर्यंत खाली आल्याने नवी मुंबईची हवा शनिवारी "मध्यम' पातळीपर्यंत आल्याचे दिसून आले; तर मुंबईच्या हवेतील पीएम 2.5 चे शुक्रवारी असलेले 112 मायक्रोग्रॅम प्रमाण शनिवारी मात्र 64 मायक्रोग्रॅमपर्यंत खाली आल्याची नोंद झाली. 

मुंबई बांधकामाची धूळ, वाहनांमधील प्रदूषण तसेच काही कारखान्यांमधील धुरामुळे हवा दूषित होते; मात्र शनिवारपासून अनेक ठिकाणची बांधकामे बंद झाली असून, चार चाकी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच कारखान्यांवरही नियंत्रण आल्याने प्रदूषणाच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 

मोठी बातमी - दहावीचा शेवटचा पेपर ढकलला पुढे, आता परीक्षा होणार 'या' तारखेनंतर

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतही घट 

मुंबईत दररोज आठ हजार लीटर पेट्रोल आणि सहा हजार लीटर डिझेलची विक्री होते. पेट्रोलची विक्री 20 टक्‍क्‍यांपर्यंत आज खाली आहे; तर डिझेलची विक्री 40 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे, असे मुंबई पेट्रोल डिलर असोसिएशनचे रवी शिंदे यांनी सांगितले. गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी मुंबईतील हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण 12 मायक्रोग्रॅम होते. रायगड जिल्ह्यातील कारखान्यांतील प्रदूषण आणि घाटमाथ्यावरील वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे नवी मुंबईच्या प्रदूषणाची पातळी वाढलेली असते; मात्र शनिवारी येथेही प्रदूषणाच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. 

बीकेसीही स्वच्छ 

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल हे शहरातील सर्वांत प्रदूषित ठिकाण मानले जाते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून या भागातील प्रदूषणाची पातळीही सुधारली आहे. शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात हवा समाधानकारक पातळीवर स्वच्छ होती; तर येथे शुक्रवारी मध्यम स्वरूपाचे प्रदूषण होते. या भागातही प्रदूषणाची पातळी 24 तासांत निम्म्याने कमी झाली आहे. 5 सप्टेंबर 2019 रोजी याच ठिकाणी पीएम 2.5 चे प्रमाण 18 मायक्रो ग्रॅम होते. 

मोठी बातमी - अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

अंधेरीत सर्वाधिक प्रदूषण 

अंधेरी येथे शनिवारी शहरातील सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली. प्रत्येक घनमीटर हवेत 108 मायक्रोग्रॅम पीएम 2.5 होते; तर बोरिवली येथे हे प्रमाण 72 मायक्रोग्रॅम होते. या भागात वाहनांच्या वर्दळीसोबतच निवासी भागातील प्रदूषणाच्या पातळीत फारसा फरक पडलेला नाही. 

हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण (प्रत्येक घनमीटर हवेत) 

  • ठिकाण - शुक्रवारी (मायक्रो ग्रॅम) - शनिवारी (मायक्रो ग्रॅम) 
  • दिल्ली - 156 --132 
  • नवी मुंबई -303 --126 
  • मुंबई -112 --64 
  • वांद्रे कुर्ला संकुल -145 --71 

pollution of mumbai navi mumbai reduced by 50 percentent due to corona lock down

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pollution of mumbai navi mumbai reduced by 50 percent due to corona lock down