थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

थायलंडहून परतलेल्या चौघांना पालघर रेल्वेस्थानकात कच्छ एक्‍स्प्रेस थांबवून गुरुवारी (ता.19) संध्याकाळी 7.10 च्या सुमारास उतरवण्यात आले. कोरोना संशयित म्हणून तक्रार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गाडी थांबवून ही कारवाई केली.

पालघर : थायलंडहून परतलेल्या चौघांना पालघर रेल्वेस्थानकात कच्छ एक्‍स्प्रेस थांबवून गुरुवारी (ता.19) संध्याकाळी 7.10 च्या सुमारास उतरवण्यात आले. कोरोना संशयित म्हणून तक्रार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गाडी थांबवून ही कारवाई केली. या चार प्रवाशांमध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी चार प्रवाशांना गरीब रथ एक्‍स्प्रेसमधून उतरवून खासगी वाहनाने पुढे सोडण्यात आले. त्यानंतरची अशा पद्धतीची ही दुसरी घटना आहे. 

हेही वाचा - त्याने धावत्या लोकलमधून वृद्धास ढकललं! वाचा नेमकं काय झालं...

या चौघांमधील एका जोडप्याचे नुकतेच लग्न झाल्याने ते मित्रांसह थायलंडला फिरायला गेले होते. बुधवारी (ता.20) ते थायलंड येथून मुंबई विमानतळावर उतरले. त्या ठिकाणाहून ठाणे येथील आपल्या नातेवाईकांकडे गेले. त्यानंतर त्यांनी कच्छला जाण्यासाठी रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग केले. वांद्रे येथे ट्रेन पकडून ते आपल्या गावी वापी येथे जात होते. रेल्वेमध्ये गप्पा मारताना सहप्रवाशांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी थायलंडहून आल्याचे सांगितले. त्यामुळे सहप्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाकडून या ट्रेनला पालघर येथे थांबा देऊन, त्यांना उतरविण्यात आले. 

हेही वाचा - २१ वर्षांनंतर त्याला झाली अटक; केलं होतं कृत्य...

होम कॉरंटाईनचा शिक्का नाही! 
हे चौघे थायलंडहून आल्याची तिकिटे त्यांच्याकडे असली, तरी होम कॉरंटाईनचा कोणताही शिक्का त्यांच्या हातावर दिसला नाही. याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रेल्वे पोलिसांनी या दोन्ही जोडप्यांची चौकशी करून त्यांना खासगी वाहनाने पुढे पाठवले. मात्र पोलिसांनी त्यांना होम कोरंटाईन केल्याबाबतची चौकशी यंत्रणांकडे न करता स्थानिक वैद्यकीय पाथकाकडून तपासून पुढे पाठवून दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Korona suspects returning from Thailand on a dangerous journey by the Kutch Express