पॉलिटेक्‍निक कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

दहावी निकालापूर्वीच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्‍निक प्रवेशाला प्रारंभ केला. अर्ज नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने संचालनालयाने प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले नव्हते.

मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रथम वर्ष तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) प्रवेशाच्या अर्ज नोंदणीनंतर प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला गुरुवार (ता.11) पासून प्रारंभ होणार आहे. गुरूवारी प्रवेशासाठी उपलब्ध जागा जाहीर करण्यात येणार आहेत. तर विद्यार्थ्यांना संस्था व कोर्सचे पसंतीक्रम 12 ते 14 जुलैपर्यंत भरता येणार आहेत. 

दहावी निकालापूर्वीच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्‍निक प्रवेशाला प्रारंभ केला. अर्ज नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने संचालनालयाने प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले नव्हते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, यासाठी तीन वेळा अर्ज भरण्यास तीन वेळा मुदत देण्यात आली होती. अखेरच्या 3 जुलैच्या मुदतीपर्यंत 91 हजार 298 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. यापैकी 71 हजार 989 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरला आहे. तर 66 हजार 210 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरुन प्रवेश अर्ज निश्‍चित केला होता. सर्वसाधारण आणि पक्‍की यादी जाहीर केल्यानंतर संचालनालयाने प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले आहे. 

प्रवेशासाठी उपलब्ध जागांची यादी 11 जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर 12 ते 14 जुलै या काळात विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय आणि अभ्यासक्रम नोंदवता येणार आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची 16 जुलै रोजी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 17 ते 19 जुलै या काळात एआरसी केंद्रांच्या ठिकाणी जावून प्रवेश कर्न्फम करायचा आहे. त्यानंतर 18 ते 20 जुलै या कालावधीत महाविद्यालयामध्ये जावून प्रवेश निश्‍चित करायचा आहे.

यानंतर 22 जुलै पासून दुसऱ्या कॅप कॅप राऊंडला सुरूवात होणार आहे. 22 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती जाहीर होणार आहे. 23 आणि 25 जुलै रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंती पर्याय निश्‍चित करायचे आहे. 27 जुलै रोजी दुसरा कॅप राऊंड होईल. 28 आणि 3 जुलै रोजी विद्यार्थ्यांना एआरसी केंद्राला भेट द्यायची आहे. 29 आणि 31 जुलै रोजी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करायचे आहे.

त्यानंतर तिसऱ्या कॅप राऊंडसाठी 1 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होईल. 2 आणि 4 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना या यादीसाठी महाविद्यालय पसंती पर्याय निश्‍चित करायचे आहे. 7 आणि 8 आणि 11 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polytechnic cap round schedule released today