भंगारावरून राडा... शिवसेना आमदाराच्या मुलाच्या गाडीची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena-MLA-Son-Car

राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण

भंगारावरून राडा... शिवसेना आमदाराच्या मुलाच्या गाडीची तोडफोड

महाड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूरमध्ये एक विचित्र घटना घडली. या विभागात विळे या भागात औद्योगिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पॉस्को (POSCO) कंपनीत भंगाराचा वाद उफाळून आला. गेल्या काही दिवसांपासून पॉस्को कारखान्यातून निघणारं भंगार कोण घेणार?, यावरून मोठा वाद सुरू आहे. दोन-चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला. याच मुद्द्यावर शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले. तसंच या वादातून आमदाराच्या मुलाची गाडी फोडल्याची घटना घडली.

भंगारावरून सुरू असलेला वाद सध्यातरी शांत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याच वादातून आधी दोन ट्रक जाळले गेले होते. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना मारहाण देखील झाली होती. हा वाद विकोपाला पोहोचला असून रविवारी दुपारच्या सुमारास कोलाड-पुणे मार्गावर सुतारवाडी गाव परिसरात तुफान हाणामारी झाली. यामध्ये पॉस्को स्टील कंपनीतून भंगार घेऊन येणाऱ्या पाच ट्रकसह २५ गाड्या फोडण्यात आल्या. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाच्या फोर्ड इंडेव्हर कारचीही तोडफोड करण्यात आली.

घडलेल्या प्रकारामुळे सध्या आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान भविष्यात हे प्रकरण कसे वळण घेणार?, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

(संपादन- विराज भागवत)