कोरोनाच्या खडतर काळात मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbaikars

कोरोनाच्या खडतर काळात मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी!

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून राज्य 'लॉकडाउन'मध्ये आहे

मुंबई: राज्यात कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. गेले काही दिवस कोरोनाच्या नव्या रूग्णांचे प्रमाण आणि मृत्यूंची संख्या दोन्ही गोष्टी नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 500हूनही कमी (441) कोरोनाचे नवे रूग्ण आढळले आहेत. एकेकाळी ही संख्या १० हजारांच्या घरात गेली होती. तसेच, शंभराच्या घरात असणारी मृत्यूंची संख्या खूपच कमी झाली असून दिवसभरात केवळ 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत 441 नवीन रुग्ण सापडल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,28,615 इतकी झाली आहे. तर 8 मृत्यूंसह मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 644 इतका झाला आहे. (Positive News from Mumbai in Lockdown as Corona Positivity Rate and Death Rate Continuously decreasing)

महत्वाची बाब म्हणजे, गेले अनेक दिवस कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,03,677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 75,92,501 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.7 % पर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 925 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 6,950 हजारांवर आला आहे.

मुंबईतील धारावी विभागात केवळ 1 नवा रुग्ण आढळला असून धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6,918 आहे. दादरमध्ये 6 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 9,780  झाली आहे. माहीममध्ये 3 नवे रुग्ण सापडले असून माहीममधील एकूण रुग्णसंख्या 10,093 झाली आहेत.