नाना पटोलेंच्या 'पाळत' विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोलेंच्या 'पाळत' विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

नाना पटोलेंच्या 'पाळत' विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

अमित शाह यांनाही नाव न घेता लगावला टोला

----------------------------------------------------------------

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या एका कार्यक्रमात केला. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने दोन पक्ष आपल्याला त्रास देतील असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवरून राजकीय वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटोलेंच्या विधानावर स्पष्टपणे मत मांडले. (Congress Nana Patole Keeping Watch Comment Sanjay Raut slashes Claims)

"नाना पटोले हे राज्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. नाना पटोलेंवर कोण पाळत ठेवेल? कशासाठी ठेवेल? या गोष्टींचा विचार करायला हवा. त्यांच्यावरती कोणीही कशाला पाळत ठेवेल? उलट नाना पटोले यांना सरकारी सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गृहखाते सुरक्षा विषयक माहिती कायमच घेत असतं. अशा वेळी पाळत ठेवली जात आहे असं म्हणणं योग्य नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे असं मला समजलं आहे", असे मत त्यांनी व्यक्त केले.

"विविध साखर कारखान्यांवर 'ईडी'कडून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकारकडून असं कृत्य केलं जाणं योग्य नाही. सहकार चळवळ उद्ध्वस्त करण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. सहकार क्षेत्रात जे लोक पाय रोवू शकलेले नाहीत असे काही लोक ही सहकार चळवळ मोडण्यासाठी आग्रही आहेत", असा टोला त्यांनी नाव न घेता केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर अनेकदा टीकास्त्र सोडलं आहे. 'अरे ला कारे' करण्याची भाषा महिलांनाही येते, असा इशारा त्यांनी राऊतांना दिला होता. त्यामुळे राऊत यावर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होतं. पण, चित्रा वाघ या लहान सहान विषयावर मी बोलणार नाही, असं वक्तव्य करत त्यांनी बोलणं टाळलं.