पोस्ट कोविड आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रूग्णालयांचा ‘रिकव्हरी क्लिनिक’वर भर

पोस्ट कोविड आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रूग्णालयांचा ‘रिकव्हरी क्लिनिक’वर भर

मुंबई:  कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना 40 टक्के रूग्णांना आता वेगवेगळ्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतोय. श्वास लागणे, किडनी तसेच ह्रदयाविषयाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे रूग्णालयांनी आता रिकव्हरी क्लिनिक सुरू करण्यावर भर दिला आहे. यामाध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमून त्यांच्या मदतीने रूग्णांवर उपचार करण्यात येताहेत. 

खासगी रूग्णालयांत देखील कोरोना बाधित रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यात आले. येथून बऱ्या झालेल्या रूग्णांना कोविडनंतर इतर आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. यासाठी नवी मुंबईतील ‘अपोलो हॉस्पिटल’ने कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या मात्र अजूनही या आजाराचा काही प्रमाणात त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी खास ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू केले आहे. 

कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी 40 टक्के व्यक्तींना गेले काही महिने श्वास लागणे, छातीत दुखणे, हृदयाविषयीच्या समस्या, सांधेदुखी, मेंदू आणि मज्जारज्जू यांच्या समस्या असे त्रास होताहेत. अशा रुग्णांसाठी ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.

कोरोनामधून बरे झालेले अनेक रूग्ण आमच्याशी संपर्क साधून काही लक्षणे सांगत आहेत. अशा रूग्णांच्या उपचारासाठी रिकव्हरी क्लिनिक सुरू करावी लागली आहेत. कोविडनंतरच्या काळजीसाठीचे हे खास दवाखाने रूग्णांना आवश्यक ते विशिष्ट उपचार मिळवून देण्यासाठी मदत करतील. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी काही मार्गदर्शक तत्वे ही तयार केली आहेत. त्यासाठी चिकित्सकांनाही प्रशिक्षण दिले आहे. ही क्लिनिक्स रुग्णांना कोरोनाच्या परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतील असे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलच्या संसर्गजन्य सल्लागार डॉ.लक्ष्मण जेसानी यांनी सांगितले. 

कोरोनामुळे शरीरातील जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. ‘स्ट्रोक’आणि हृदयविकाराचा झटका या गंभीर घटनांव्यतिरिक्त, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखी तीव्र परिस्थिती उद्भवणे हे ‘कोविड’च्या आजाराचे दुष्परिणाम आहेत. कोविड होऊन गेल्यानंतरही अनेक रुग्ण अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे आणि त्यापैकी बहुतेकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, असेही दिसून आल्याचे जेसानी यांनी पुढे सांगितले.

कोरोनाचे विषाणू हे केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांवरही हल्ले करतात. तीव्र स्वरुपात कोरोना झालेल्या आणि उपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये काही आठवडे किंवा काही महिन्यांनंतर काही लक्षणे पुन्हा दिसू लागतात. या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागलेल्या रूग्णांमध्ये आरोग्याच्या समस्या दीर्घ काळ राहतात. कोविडचा तीव्र आजार नसलेल्या रुग्णांमध्येही विषाणूचे दुष्परिणाम बराच काळ राहतात. काहींच्या दीर्घकालीन समस्या गंभीरही होतात. अश्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे जिवावर बेतू शकते. विशेष ‘रिकव्हरी क्लिनिक’ मुळे रुग्णांच्या लक्षणांचे निरीक्षण करणे आणि त्यांना गरजेनुसार तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे असे पल्मोनॉलॉजी विभागाच्या सल्लागार डॉ. जयालक्ष्मी टी. के. म्हणाल्या.

कोरोना पूर्वीही आम्ही ‘नॉन कम्युनिकेबल’आजारांच्या त्सुनामीचा सामना करीत होतो. कोरोनाच्या साथीमुळे हे आव्हान अधिक तीव्र झाले आहे. कोरोना पश्चात उद्भवणाऱ्या लक्षणांमुळे या ‘नॉन कम्युनिकेबल’आजारांच्या प्रमाणात भर पडली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर होतील. कोरोनामधून बरे झालेले आणि आता अनेक तक्रारी करणारे सुमारे 250 रुग्ण आमच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) आहेत. ‘कोव्हॅलेसंट प्लाझ्मा’च्या चाचण्या आणि त्याचे दान हा उपक्रम पालिकेच्या सहकार्याने राबविण्याबरोबरच रुग्ण-केंद्रित, सर्वसमावेशक, टेलिमेडिसिन क्लिनिक पद्धतींनी सुद्धा कोरोनावर उपचार करण्यात येतात असे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी आणि युनिटचे प्रमुख संतोष मराठे यांनी सांगितले.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Post covid health complaints increased with hospitals focusing on recovery clinics

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com