पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंधासाठी एप्रिलपर्यंत मुदतवाढ देणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

भाग्यश्री भुवड
Wednesday, 7 October 2020

विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याबरोबरच प्रबंधासाठी आवश्‍यक असणाऱ्या केसेसची संख्याही कमी करण्यात येईल. तीन महिन्यांच्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्यासाठीही मुदत देण्यात येईल. 

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्‍यक असते; मात्र कोव्हिडमुळे प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत मुदत देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

सायबर अटॅकमुळे आयडॉलच्या परीक्षेचा गोंधळ, पेपर पुढे ढकलले
 
महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्‍टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्‍टर्स यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ, उपाध्यक्ष डॉ. सतीश तांदळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. अविनाश साकनुरे, सचिव डॉ. शरिवा रणदिवे, डॉ. शरयू सूर्यवंशी उपस्थित होते. 

अमित देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याबरोबरच प्रबंधासाठी आवश्‍यक असणाऱ्या केसेसची संख्याही कमी करण्यात येईल. तीन महिन्यांच्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्यासाठीही मुदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून कोव्हिडमुळे विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया होत नसल्याने या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी, तसेच 15 ऑक्‍टोबरपासून वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. 

दरम्यान, एम्सच्या धर्तीवर येत्या 15 ऑक्‍टोबरपासून शैक्षणिक सत्र सुरू करणे, कोव्हिडमुळे बंद असलेल्या विविध शस्त्रक्रिया प्रशिक्षण सुरू करणे, प्रबंधासाठी वाढीव मुदत मिळणे, शैक्षणिक शुल्क माफ करणे, जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांच्या पुन्हा परीक्षा घेणे, प्रॅक्‍टिकल अभ्यासक्रम सुरू करणे अशा काही प्रमुख मागण्या सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्या. 

वसतिगृहांचा प्रश्‍न सोडवणार! 
गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून डॉक्‍टर रात्रंदिवस कोव्हिड परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी काम करत आहेत. आता मात्र या डॉक्‍टरना विश्रांतीची आवश्‍यकता असल्याने सुटीची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत याची काळजी घेतली जाईल. अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतिगृहांची स्थिती चांगली असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वसतिगृहांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postgraduate students get extension till April for dissertation