Powercut : मुंबईतील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

तेजस वाघमारे
Monday, 12 October 2020

संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच या घटनेला कोण जबाबदार आहेत याची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच या घटनेला कोण जबाबदार आहेत याची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

हॉटस्पॉट कांदिवलीला किंचीत दिलासा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 पार

मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी देखील चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले. सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या होत्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले 

ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे मुंबईकरांच्या प्रवासाला खीळ; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Powercut CM orders inquiry into power outage in Mumbai