ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे मुंबईकरांच्या प्रवासाला खीळ; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

तुषार सोनवणे
Monday, 12 October 2020

महाविकास आघाडी सरकारने आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असले तरी, याविरोधातही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असले तरी, याविरोधातही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. 

नवी मुंबईत निष्काळजीपणा जीवावर; अत्यवस्थ स्थितीमुळे 40 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू

 

'आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी असून हा निर्णय केवळ अहंकारातून घेतला आहे. तसेच कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले असल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?' असा सवाल देवेद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू: सामना

कांजूरच्या जागेवर महायुती सरकारने विचार केला होता. उच्च न्यायालयाच्या स्थगिती होती. काही व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला होता. परंतु न्यायालयाने 2015 साली हे दावे निकाली काढले होते. परंतु  जर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर प्रकल्पाच्या विलंबाला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

कांजूरच्या जागे बद्दल फडणवीस बोलताना म्हणाले की, या जागेला स्थिर करण्यासाठी किमान 2 वर्षाचा अवधी अपेक्षित आहे. याकामासाठी आतापर्यंत काढण्यात आलेल्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील. निविदा प्रक्रीया पुन्हा राबवाव्या लागतील. जागेच्या फिजीबिलीटी अहवालाबाबत अद्यापही काही माहिती नाही. हा मेट्रो प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता.परंतु आता कांजूरची जागा निश्चितीमुळे हा प्रकल्प अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला आहे. आरेच्या ठिकाणी होणाऱ्या कारशेड प्रकल्पावर आधीच 400 कोटींची रक्कम खर्च झाली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या निर्णयामुळे ही रक्कम वाया गेली आहे. 

 

खंडीत विद्युत पुरवठ्याचा रुग्णालयावर परिणाम नाही; मुंबई महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

ठाकरे सरकारने आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवासाला खीळ बसवली आहे. त्यातून हे सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? ही जनतेची मोठी दिशाभूल असल्याची गंभीर टीका फडणवीस यांनी केली आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray governments ego hinders Mumbaikars journey Criticism of Devendra Fadnavis