esakal | स्थानिकांचा विरोध डावलून‘एअरफोर्स’ होऊ देणार नाही- प्रशांत ठाकूर| Prashant Thakur
sakal

बोलून बातमी शोधा

prashant thakur

स्थानिकांचा विरोध डावलून‘एअरफोर्स’ होऊ देणार नाही- प्रशांत ठाकूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : तालुक्यातील कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरात एअरफोर्स प्रकल्प (Airforce project) उभारण्यात येत आहे. कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरातील १८० एकर जमीन एअरफोर्ससाठी संपादन (land acquisition) करण्याबाबत पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती; मात्र ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे एअरफोर्स होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर (prashnat thakur) यांनी जमीन संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडली.

हेही वाचा: सिडकोकडून बाजारात १४ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, शिवसेनेचे बबन पाटील, पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे आमोद ठक्कर, संरक्षण खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सर्वांनी या भूसंपादनाला विरोध दर्शविला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, प्रकल्पाला १८० एकर जागा लागणार आहे. त्यामुळे ९०० चौरस मीटर परिसरातील ग्रामस्थांच्या बांधकामांवर बंधने येणार आहेत. तीन मीटरपेक्षा उंच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. उरण तालुक्यातील मोरा येथे नॅशनल अमिनेशन डेपो (एनएडी)मुळे तेथील स्थानिकांच्या बांधकामावर बंधने आली. आज त्यांच्या पूर्वी केलेल्या बांधकामांवरही कायम टांगती तलवार आहे.

"देशासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असला तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध डावलून प्रकल्प होऊ नये. स्थानिकांना प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये. यासाठी मी तुमच्यासोबत आहे."
- प्रशांत ठाकूर, आमदार

loading image
go to top