अरे चाललंय काय? कोरोनाग्रस्त गर्भवती महिला 6 तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 25 मे 2020

डोंबिवलीत एका कोरोनाबाधित गर्भवती महिलेला तब्बल 6 तास  रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

डोंबिवली :  कल्याण-डोंबिवली शहरात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे प्रकार घडत असतानाच पुन्हा एकदा डोंबिवलीत एका कोरोनाबाधित गर्भवती महिलेला तब्बल 6 तास  रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा करावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची माहिती स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याने या महिलेला रुग्णवाहिका मिळाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

डोंबिवलीत राहणा-या एका गर्भवती महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर कोव्हीड रुग्णालयात फोन केला. यावर रुग्णालय प्रशासनाने आमच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसून तुम्ही ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा असा सल्ला  दिला. त्यानंतर 6 तास महिलेने रुग्णवाहिकेची प्रतीक्षा केली. याबाबत मनसेने पदाधिकारी ओम लोके आणि सागर मुळे यांना माहिती मिळताच त्यांनी  प्रशासनाला संपर्क साधत त्यांच्यावर दबाव आणला. त्यानंतर रुग्णवाहिका आल्यानंतर ओम आणि सागर हे दोघेही या महिलेला ठाणे सिव्हिल रुग्णालयात सोडून आले.

मुंबई महापालिकेची 'ट्रेसिंग टीम' म्हणजे नेमकं काय? ही टीम कशी करते काम जाणून घ्या

दरम्यान रुग्णवाहिकेअभावी  रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागण्याची ही तिसरी घटना असून यामुळे पुन्हा  केडीएमसीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant women with corona positive waiting 6 hours for an ambulance; Shocking case in Dombivli