esakal | रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्राकडून 80 ट्रेनची मागणी केली जात असताना प्रत्यक्षात केवळ 40 ट्रेनच सोडण्यात येत आहेत, असं म्हणत टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तर त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वीच 200 ट्रेन सोडणार असल्याची घोषणा केली. तसंच रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्राकडून 80 ट्रेनची मागणी केली जात असताना प्रत्यक्षात केवळ 40 ट्रेनच सोडण्यात येत आहेत, असं म्हणत टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तर त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. 

पियुष गोयल ट्विटमध्ये काय म्हणाले?
या वादाची सुरुवात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटनं झाली आहे. रेल्वेमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, उद्धवजी आशा आहे की तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. आम्ही उद्यापासून महाराष्ट्राला रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही सांगितलं. तुम्हाला विनंती आहे की, त्यासाठी सर्व आवश्यक माहिती रेल्वे ट्रेन कुठून सुटणार? रेल्वे गाड्यांनुसार मजुरांची यादी, त्यांची तपासणी केलेलं आरोग्य प्रमाणपत्र आणि रेल्वे कुठून कुठे जाणार? या सर्वांची माहिती पुढील एका तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्यावी. त्यानुसार आम्हाला रेल्वेचे वेळेनुसार नियोजन करता येईल.

अशी आशा करतो की, यापूर्वी प्रमाणे ट्रेन रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रिकामी परत जाणार नाही. तुम्हाला हव्या तितक्या रेल्वे गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातील, असं आश्वासनं रेल्वेमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटवर संजय राऊत काय म्हणाले

पियुष गोयल यांच्या ट्विटला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर देत त्यांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक विनंती आहे की ज्या स्टेशनवर ट्रेन पोहोचायला हवी, ती त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले

ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे 7 लाख मजूर 481 ट्रेन्सच्या माध्यमातून आपआपल्या राज्यात परत गेले. त्यांच्या प्रवाशी भाड्याची 85 टक्के रक्क केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल. पण त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी 100 टक्के खर्च करत आतापर्यंत 85 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात म्हटलं. तसंच राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे. त्यामुळेच परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं.