esakal | महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार की महाराष्ट्रात लागणार मध्यावधी ?
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार की महाराष्ट्रात लागणार मध्यावधी ?
  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू 
  • राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब 
  • आता कशी असतील नवी समीकरणं?

महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार की महाराष्ट्रात लागणार मध्यावधी ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा सोपा कौल महाराष्ट्राच्या जनतेनं दिला होता. हा कौल होता शिवसेना भाजप महायुतीला. तब्बल 161 जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या. मात्र, परस्परांबद्दलचा अविश्वास आणि जागावाटपातल्या संभ्रमातून युती फुटली आणि न भूतो अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजपकडे सर्वाधिक 105 जागा असल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शनिवारी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, आपल्याकडे संख्याबळ कमी असल्याचं म्हणत भाजपनं सरकार स्थापनेला असमर्थता दर्शवली..

भाजपनं असमर्थता दर्शवताच राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले..राष्ट्रवादीच्या अटीनुसार अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली..मात्र, ही चर्चा काही फळाला आली नाही. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचं समर्थनपत्र मिळवता आलं नाही. त्यातच त्यांनी मागितलेला वाढीव वेळ देण्यासही राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं.

त्यानंतर तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी विचारणा केली. मात्र, त्यांनीही वाढीव वेळ मागितला. त्यांचीही ही विनंती राज्यपालांनी फेटाळली आणि अखेर दुपारीच राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रपतींनी या शिफारशींवर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू होत्या. त्यामुळे राष्ट्रपती राजवट किती काळ टिकते? सरकार स्थापन करण्याचे पुन्हा प्रयत्न होतात की काही काळानं थेट निवडणुकीलाच सामोरं जावं लागतं, हे नजिकच्या काळात दिसून येईल.

WebTitle : presidents rule in Maharashtra now what will be political scenario in Maharashtra