पालिकेचे मुख्यमंत्र्यांसमोरील सादरीकरण वादात 

पालिकेचे मुख्यमंत्र्यांसमोरील सादरीकरण वादात 

मुंबई - शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे सादरीकरण महापालिकेत न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केल्याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मंत्रालयात मुंबईचे सत्ताकेंद्र आहे का, असा परखड प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला. त्यांना शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी साथ दिल्यामुळे भाजप विरुद्ध इतर पक्ष असे वातावरण आज बैठकीत निर्माण झाले होते. 

पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी घेतली. आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबतचे सादरीकरण केले. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राखी जाधव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. गटनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर सर्वप्रथम माहिती देणे गरजेचे होते. काही समस्या निर्माण झाल्यास नागरिक नगरसेवकांना विचारणा करतात. मुंबईचे सत्ताकेंद्र मंत्रालय झाले आहे का, असा परखड प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यांना भाजपचे गटनेते मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांनी तत्काळ प्रतित्तर दिले. 

मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास विभाग असून त्यांना काळजी असल्याने पुढाकार घेतल्याचे कोटक यांनी नमूद केले. महापौरांना कोणी रोखले होते, असा प्रश्‍न करत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिंदे यांनी मुंबईची काळजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे उलट आभार मानले पाहिजेत, असा चिमटा काढला. 

भाजपने शिवसेनेला या वादात ओढल्यामुळे शिवसेनेच्या राजूल पटेल यांनीही भाजपवर हल्ला चढवला. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच वादात ओढले. हा वाद वाढत चालला असल्याचे दिसताच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यास विरोध नाही, पण महापौरांना सर्वप्रथम माहिती देणे गरजेचे होते, असे त्यांनी नमूद केले. 

लोकशाहीला मारक : महापौर 
मुख्यमंत्र्यांना मुंबईसंदर्भात बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र पालिकेच्या कामात मुख्यमंत्र्यांनी नाहक ढवळाढवळ करणे योग्य नाही, अशा शब्दांत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नाराजी व्यक्त केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत झालेल्या बैठकीसाठी महापौरांना बोलवणे का गरजेचे वाटले नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला. मुख्यमंत्री हेही नागपूरचे महापौर होते. त्यामुळे त्यांना हे माहीत असणे गरजेचे आहे. हे राजकारण दुर्दैवी असून लोकशाहीला मारक असल्याचेही महाडेश्‍वर यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com