Mumbai : खासगी रुग्णालयांना चाप ; दरफलक लावण्याचे मिरा-भाईंदर पालिकेचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी रुग्णालयांना चाप ; दरफलक लावण्याचे मिरा-भाईंदर पालिकेचे आदेश

खासगी रुग्णालयांना चाप ; दरफलक लावण्याचे मिरा-भाईंदर पालिकेचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : रुग्णांकडून भरमसाठ शुल्क उकळण्याच्या मिरा-भाईंदरमधील खासगी रुग्णालयांच्या प्रवृत्तीला आता लगाम बसणार आहे. रुग्णालयात देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या दरांचा फलक आता प्रत्येक खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात लावावा लागणार आहे. मिरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तशा नोटिसा रुग्णालयांना पाठवण्यात आल्या आहेत.

एखादा रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला की, त्याच्यावर होणाऱ्या उपचारांची आणि त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांची त्याला कल्पनाच नसते आणि अनेक रुग्णालयांकडून उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची कल्पनाही रुग्णाच्या नातेवाइकांना सुरुवातीला दिली जात नाही. त्यामुळे रुग्ण बरा झाला की रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्याच्या हातात उपचाराचे लाखो रुपयांचे देयक ठेवण्यात आल्यानंतर रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचे डोळेच पांढरे होत असतात. हे देयक भागवण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यात मग त्यांच्या अक्षरश: नाकी नऊ येत असते. अनेक वेळा एकाच प्रकारच्या आजारासाठी विविध रुग्णालयांच्या दरांमध्ये प्रचंड तफावत असल्याचेही आढळून येत आहे.

रुग्णांची ही अवस्था टाळण्यासाठी रुग्णालयाकडून आकारलेल्या प्रत्येक आरोग्य सेवांचे दर रुग्णालयाला जाहीर करण्याचे आदेश मिरा-भाईंदर पालिकेने दिले आहेत. हे दर रुग्णांना सहज दिसतील अशा दर्शनी भागात लावायचे आहेत. जेणेकरून आपल्यावर होणाऱ्या उपचारासाठी साधारणपणे किती खर्च येईल याची आगाऊ कल्पना रुग्णाला मिळू शकेल. एवढेच नाही तर प्रत्येक आजारासाठी किती शुल्क आकारले जावेत याचे देखील निर्बंध रुग्णालय व्यवस्थापनावर घालण्यात आले आहेत.

१५ दिवसांची मुदत

एकाच प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी समान दर्जाच्या रुग्ण सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे दर थोड्याफार फरकाने सारखेच असले पाहिजेत, असे बंधन महापालिकेकडून घालण्यात आले आहे. दर फलक येत्या १५ दिवसांच्या कालवधीत रुग्णालयांनी लावायचे आहेत. मिरा-भाईंदर शहरात सुमारे १६० खासगी रुग्णालये आहेत. या सर्वांना दरफलकाबाबतच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

loading image
go to top