मुख्याध्यापकच विद्यार्थिनीशी असा वागला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

शिरोळ येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुख्याध्यापकाने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

 
शहापूर : शिरोळ येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुख्याध्यापकाने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थिनीने प्रभारी मुख्याध्यापक आपल्याशी गैरवर्तन करीत असल्याचे पत्र आदिवासी विकास प्रकल्पाच्या वरिष्ठांना पाठवल्याने हा प्रकार उघड झाला. 

याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक डी. जे. पवार यांना ठाणे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संजय मीना यांनी तत्काळ निलंबित केले; मात्र निलंबनाची कारवाई ही तात्पुरती स्वरूपाची असल्याचा आरोप करीत संबंधित शिक्षकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आदिवासी फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र खंडवी यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या या आश्रमशाळेत तब्बल 450 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

ही बातमी वाचा ः कोरोनाच्या भीतीने अर्णाळा किणाऱ्यावर शुकशुकाट

तालुक्‍यातील अतिदुर्गम असलेल्या या आश्रमशाळेत इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीसोबत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. जे. पवार नेहमी गैरवर्तन करत असल्याने या विद्यार्थिनीने याबाबतची तक्रार आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात लेखी पत्राद्वारे केली होती. तक्रारीची दखल घेत मुख्याध्यापक डी. जे. पवार यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करत, त्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे लेखी आदेशाचे पत्र 5 मार्च रोजी दिल्याची माहिती बाहेर आल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

फौजदारी कारवाईची मागणी 
काही महिन्यांपूर्वीदेखील याच आश्रमशाळेतील विद्यार्थिनीशी गैरवर्तन होत असल्याची चर्चा बाहेर आली होती; मात्र त्या वेळेस त्या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना दमदाटी करून तक्रार करू दिली नसल्याचा आरोप आदिवासी फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र खंडवी यांनी केला आहे. तसेच प्रभारी मुख्याध्यापक पवार याच्यावर लवकरात लवकर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Principal misbehaves with student