भायखळा आणि आर्थर रोडच्या कैद्यांना शाळेत पाठवण्यात येणार; पण का? वाचा सविस्तर

भायखळा आणि आर्थर रोडच्या कैद्यांना शाळेत पाठवण्यात येणार; पण का? वाचा सविस्तर

मुंबई- उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होईल. त्यातच मुंबईतला कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करताहेत. मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनानं काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. कारागृहातील कोरोना थांबवण्यासाठी प्रशासनानं काही निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच मुंबईतल्या दोन शाळांचं आता तात्पुरतं कारागृहात रुपांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या शाळांमध्ये भायखळा महिला कारागृह आणि आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

कोरोनासारख्या साथीच्या रोगापासून कैद्यांना दूर ठेवण्यासाठी सरकारी-मालकीच्या किंवा खाजगी इमारती ताब्यात घेऊन त्याचं रुपांतर तात्पुरत्या कारागृहात करावं अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. यासंबंधी राज्य गृह विभागानं अधिसूचना जारी केली होती. 

कैद्यांना ज्या ठिकाणी ठेवलं जाऊ शकतं अशा ठिकाणांसंबंधी चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवटकर यांनी दिली. तात्पुरत्या कारागृहाची स्थापना करतानाही तुरूंगाच्या नियमाप्रमाणे काही आवश्यकता पाळणं हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुरूंग विभागाकडून त्यातल्या आवश्यक बाबींचा तपशील मागविण्यात आला आहे. या माहितीच्या आधारानुसार, यात शाळांसह काही पर्याय देण्यात आले. त्यापैकी दोन ठिकाणांची पाहणी झाली असल्याचंही निवटकर म्हणालेत. 

कैद्यांची सुरक्षितता महत्त्वाची

अधिकाऱ्यानं म्हटलं की, ही इमारत म्हणजे कैद्यांचं घर असेल. त्यामुळे त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं हे पहिलं प्राधान्य असेल. कारागृह प्रशासनानं या प्रस्तावात योग्य वेंटिलेशन, बाथरुम आणि योग्य प्रमाणातला पॅसेज असणं या गोष्टी नमूद करत या गोष्टी गरजेच्या असल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक दीपक पांडे महानिरीक्षक यांनी दिली. 

भायखळा कारागृहाजवळील एका शाळेत नवीन महिला कैद्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. यात शाळेचा वापर नवीन कैद्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यासाठी करण्यात येईल. त्यानंतर त्यांना मुख्य कारागृहात पाठवण्यात येणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. मुंबई सेंट्रलमधल्या अन्य शाळा आर्थर रोड कारागृहातील कैद्यांसाठी वापरल्या जातील.

सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या कारागृहातील सर्व पुरुष कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येत आहे. तर महिला कैद्यांना भायखळा, ठाणे आणि कल्याण कारागृहात पाठविण्यात आले आहे.

23 जिल्ह्यांमध्ये तात्पुरतं कारागृह 

मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्याच्या सुरूवातीला तुरूंग विभागाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राज्यभरात 23 जिल्ह्यांनी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये तात्पुरती कारागृह उभारली आहेत. कल्याणमध्ये शाळा वाटप झाल्यानंतर तळोजा सोडून या तुरुंगातही नवीन प्रवेशही पाठविण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं. राज्यभरात तात्पुरत्या कारागृहात एक हजाराहून अधिक कैदी पुरुष आणि महिला दोन्ही तुरूंगात आहेत.

दरम्यान, 54 वर्षीय महिला कैदी भायखळा कारागृहात कोविड-19 पॉझिटिव्ह आढळली होती. त्या महिलेची प्रकृती ठिक झाली असून ती या आठवड्यात पुन्हा तुरुंगात परतली. तसंच आर्थर रोड कारागृहातील सुमारे 120 कैदी जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ते सुद्धा बरे झाले असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

Prisoner of Byculla and Arthur Road jails will be kept in these schools in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com