मशिन सुरु होत नाही तोपर्यंत एकही गाडी येऊ देणार नाही; स्थानिकांचा प्रशासनाला इशारा

बारावे प्रकल्पात कचरा डंम्प करु नका
Protest local citizens at the site of Barave Solid Waste Project Kalyan
Protest local citizens at the site of Barave Solid Waste Project Kalyan

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील बारावे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग लागल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून येथील मशिनरी बंद पडली आहे. कचऱ्यावर प्रक्रीया करणारी मशिन बंद असतानाही येथे घंटागाडीतून कचरा आणून टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी करुन देखील पालिका दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बारावे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्रित जमत आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

कल्याण पश्चिमेला रिंगरोड व उल्हास नदीला लागून असलेल्या बारावे परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. याठिकाणी सुक्या कचऱ्या वर प्रक्रिया केली जाते. तीन महिन्यांपूर्वी अचानक प्रकल्पाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रकल्पातील मशिनरींना देखील याचा फटका बसला असून त्या बंद पडल्या आहेत. मशीन बंद असतानाही या ठिकाणी शहरातील कचरा हा घंटागाडीतून आणून टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सतत पडणारा पाऊस आणि कचरा यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

बारावे कचरा प्रकल्पाला सुरुवातीपासून येथील नागरिकांकडून, सामाजिक संस्थाकडून विरोध झाला होता. परंतू तरीही येथे प्रकल्प सुरु झाला. एप्रिल महिन्यात येथील कचरा प्रकल्पाला अचानक आग लागली आगीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या चार मशिनरी या जळून खाक झाल्या होत्या. तेव्हापासून हा प्रकल्प बंद अवस्थेत आहे. कचरा प्रकल्प बंद असताना येथे कचरा का आणून टाकला जात आहे ? असा सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. कचऱ्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरत असून परिसरातील नागरिक या समस्यांना तोंड देत आहेत. या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांनी बुधवारी प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्र जमत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्यांना आम्हाला कृती हवी आहे, आश्वासने नकोत असे बोल सुनावले. बंद पडलेली मशिनरी तत्काळ सुरु करा किंवा प्रकल्प बंद करा अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.

गेल्या चार वर्षापासून आम्ही त्रास सहन करत आहोत. एकीकडे बोलले जाते स्वच्छ भारत पण आमच्या परिसरात कोठेही स्वच्छता नाही. या कचऱ्यामुळे आम्हाला दुर्गंधी सोबतच घाणीचा सामना करावा लागत आहे.

मुळात हा प्रकल्प येथे नको असताना येथे आणला आहे. गव्हर्नरमेट मुळेच हा अत्याचार होत आहे, पालिका व पोलिस प्रशासन त्यांच्यासोबत आहे. आंदोलन केली, विरोध केला की तीन ते चार दिवस मशिन बंद रहाते, गाड्या बंद होतात, मात्र पुन्हा हे सुरु होते. हे असेच सुरु राहणार आहे. ओला आणि सुका कोणताही कचरा आम्हाला या भागात नको आहे, हा प्रकल्प सरकारने बंद करावा हीच आमची मागणी आहे.

- शितल शिंपे, स्थानिक नागरिक.

बारावे येथे घनकचरा प्रकल्प नको म्हणून या प्रभागातील नागरिकांनी 2016, 2018 ला आंदोलन केले, तरीही येथे प्रकल्प उभारला गेला. त्यानंतर आता 2022 मध्ये पुन्हा आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एप्रिल महिन्यात लागलेल्या आगीने येथील मशिन बंद पडल्या आहेत. मशिन बंद असतानाही येथे कचरा आणून टाकला जात असल्याने प्रकल्पाचे डंम्पिंगमध्ये परिवर्तन होत चालले आहे. प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचे झाले आहे, तक्रार करुन देखील दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी आज हे आंदोलन केले आहे. जोपर्यंत मशिन चालू होत नाही, तोपर्यंत एकही गाडी या ठिकाणी जाऊ दिली जाणार नाही. गाडी नेण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती गाडी जाळली जाईल आणि याला प्रशासन जबाबदार असेल हा आमचा इशारा आहे.

- उल्हास भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com