ठाण्यात "गडकरी कट्टा'बंदी विरोधात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. त्याविरोधात आज "ठाणे मतदाता जागरण अभियाना'च्या वतीने गडगरी रंगायतनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली आहे. त्याविरोधात आज "ठाणे मतदाता जागरण अभियाना'च्या वतीने गडगरी रंगायतनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या मालकीची वास्तू असताना याच वास्तूमधून महापालिकेवर वारंवार टीका होत होती. त्यामुळेच येथील पत्रकार परिषदांवर बंदी घातल्याची चर्चा आहे. 

सामाजिक संस्था अथवा राजकीय पक्षांना आपली भूमिका मांडण्यासाठी "गडकरी कट्टा' हे महत्त्वाचे ठिकाण आहे. अतिशय कमी खर्चात येथे पत्रकार परिषद घेणे शक्‍य होत असल्याने अनेक सामाजिक संस्था या कट्ट्यावर पत्रकार परिषद घेत होत्या. मात्र, पत्रकार परिषदांमध्ये अनेक वेळा महापालिकेवर टीकाटिपण्णी करण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने क्‍लस्टरच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात येणार होती. मात्र पालिका उपायुक्तांनी हे उपाहारगृह कोणत्याही पत्रकार परिषदेला देण्यास मनाई करणारा आदेश येथील व्यवस्थापनाला दिला आहे. त्यामुळे ठाणे मतदाता जागरण अभियानाला परवानगी नाकारण्यात आली होती. 

या बंदीविरोधात शुक्रवारी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने गडकरी रंगायतनसमोर आंदोलन करून पालिकेच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. पालिकेने केलेले हे कृत्य राज्यघटनेच्या विरोधात तसेच सामान्य नागरिकांच्या हिताच्याही विरोधात आहे. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी ठाणेकरांची माफी मागावी आणि हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protests against Gadkari Katta ban in Thane