मुंबईकरांना परवडणारी वाहतूक सेवा देणार; मेट्रो ट्रेनच्या अनावरणावेळी मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 29 January 2021

येत्या तीन-चार वर्षांत मुंबईचा चेहरा पालटणार आहे. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चारकोप येथे मेट्रोच्या अनावरण सोहळ्यात काढले. 

मुंबई: भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या तीन-चार वर्षांत मुंबईचा चेहरा पालटणार आहे. सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चारकोप येथे मेट्रोच्या अनावरण सोहळ्यात काढले. 

बेंगळुरु येथून बुधवारी (ता. 27) मुंबईत मेट्रो ट्रेन दाखल झाली. या ट्रेनचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. ब्रॅंडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, ग्रहण उपकेंद्र, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्‌घाटन करण्यात आले. मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीव-रेखीव स्वरूप देत आहोत. अनावरणाचा दिवस मुंबईसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कोरोना काळात मुंबईची लोकल सेवा बंद होती. 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करणे आणि गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मेट्रो 2 अ आणि 7 मुळे मुंबईचा वेग वाढणार आहे. लोकलला पर्याय मिळाल्याने त्यावर येणारा ताण कमी होईल. शिवाय प्रवाशांनाही पर्यायी वाहतूक उपलब्ध होईल. रेल्वेला खूप गर्दी असते. आता मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली की, रेल्वेची गर्दी कमी होईल. त्यावर ताण येणार नाही. आपली मेट्रो चालकविरहित असणार आहे. मुंबईत जेवढी मेट्रोची कामे सुरू आहेत तेवढी कामे जगाच्या पाठीवर कुठेही सुरू नाहीत. मागच्या सरकारने ज्या वेगाने ही कामे केली त्यापेक्षा अधिक वेगाने आम्ही ही कामे करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 

मार्गावर मेट्रो चाचण्यांना सुरुवात होणार आहे. चार महिन्यांत या मार्गावर मेट्रो धावू लागतील. 35 किमीचा हा मेट्रो मार्ग असून, त्याद्वारे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. दोन्ही मार्गांवर मे 2021 पर्यंत सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. 2026 पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणतः 2031 पर्यंत एक कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. 
- एकनाथ शिंदे,
नगरविकास मंत्री 

सात वर्षांनी नव्या गाडीचे स्वागत 
2014 साली घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबई शहरातील पहिली मेट्रो धावली. त्यानंतर सात वर्षांनंतर मुंबईने नवीन मेट्रोचे स्वागत केले. आता या मेट्रोची वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मेपासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल. मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रोच्या (रोलिंग स्टॉंक) निर्मितीचे काम बेंगळुरु येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्प येथे सुरू आहे. 

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Provide affordable transport services to Mumbaikars Assurance of the Chief Minister at the unveiling of the metro train

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide affordable transport services to Mumbaikars Assurance of the Chief Minister at the unveiling of the metro train