सायबर गुन्हेगारांचे नवीन लक्ष मानसोपचार तज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

मुंबईत मानसोपचरतज्ज्ञ आणि त्यांच्या रुग्णांच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याच्या घटनांची वाढ झाल्याचे दिसत आहे.

सायबर गुन्हेगारांचे नवीन लक्ष मानसोपचार तज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित रुग्ण

मुंबई - मुंबईत घडलेल्या सायबर गुन्हेगारी प्रकरणात आजकाल नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. मानसोपचरतज्ज्ञ आणि त्यांच्या रुग्णांच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याच्या घटनांची वाढ झाल्याचे गुन्ह्यांच्या नोंदिंवरून दिसत आहे. मानसोपचार तज्ञ आणि त्यांचे रुग्ण सायबर घोटाळेबाजांकडून लक्ष्य केले जात आहेत. किमान डझनभर मानसोपचार तज्ञांनी या संदर्भात घटनांची पुष्टी केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मानसोपचार तज्ञांच्या नावावर बोगस खाती तयार करण्यात आली. या बोगस सोशल मीडिया खात्यातून त्यांच्याशी रुग्णांशी आणि व्यावसायिक साथीदारांकडून पैशांची मागणी केली गेली. मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून जात असलेले रुग्ण आधीच मानसिक दृष्ट्या असुरक्षित असल्याने अनेक जण या घोटाळेबाजांना बळी पडत आहेत.

नमस्कार मी डॉक्टर बोलतोय

अलीकडेच मुंबईतील महिला मानसोपचार तज्ज्ञाचा फोटो असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या एका महिला रुग्णाला मेसेज पाठवण्यात आला. या मॅसेजमध्ये "नमस्कार, मी तुमची डॉक्टर बोलत आहेत. माझी पत्नी आजारी पडली असून मी दुसऱ्या शहरात अडकलो आहे. तुम्ही या नंबरवर 30000 रुपये ट्रान्सफर करू शकता का?' असे लिहिले होते. हा मेसेज आला तेव्हा पिडीत महिलेने पैसे पाठवण्यापूर्वी विचार न करता सांगितल्याप्रमाणे पैसे ट्रान्स्फर केले. नंतर पिडीत महिलेला डॉक्टरचे सोशल मिडियावरील खाते बनावट असल्याचे लक्षात आले. त्वरित महिलेने बँकेशी संपर्क करत झालेला व्यवहार गोठवण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता. अखेरीस महिलेने या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस तपास सुरू आहे.

बनावट खात्यांमुळे फसवणूक

असाच काहीसा प्रकार मुंबईतील डॉ. हरीश शेट्टी यांच्यासोबत घडला. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉ. शेट्टी यांच्या नावांची तसेच त्यांची छायाचित्र असलेले तीन ते चार बनावट खाती सापडली. सुरुवातीला त्यांच्या संपर्कातील रूग्णांना आणि अन्य व्यक्तींना मेसेज पाठवले गेले. डॉक्टरांच्या नावाने आलेल्या मॅसेजला प्रतिसाद मिळाल्यावर पिडीत व्यक्तीचा व्हॉट्सअॅप नंबर मागण्यात यायचा. काही रूग्णांनी त्यांचे नंबर शेअर केले आणि काही जणांची फसवणूक होता होता राहिली परंतु पिडीत व्यक्तींना त्याचा खूप त्रास झाला .काही घटनांमध्ये, रुग्णांनी पैसे दिले नाहीत. परंतु, सोशल मीडियावरील सायबर घोटाळेबाजांसोबत काही रुग्णांनी वैयक्तिक तपशील सामायिक केल्याचे काही प्रकरणात समोर आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

समुपदेशन सत्र फसवणुकीचे अस्त्र

काही सायबर गुन्हेगार मानसिक रुग्णांच्या समुपदेशन सत्रांसाठी खोट्या अपॉइंटमेंट देऊन भोळ्या रुग्णांकडून आगाऊ पैसे स्वीकारतात अशा घटनांचा ट्रेंड सायबर गुन्हे विश्वात दिसून येत आहे. मुंबईतील मानसिक समुपदेशन करणाऱ्या एका मानसशास्त्रज्ञच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करण्यात आली. ज्यामध्ये त्या डॉक्टरच नाव, क्लिनिकचा पत्ता, फोटो आणि त्यांना भेटीसाठीच्या वेळा दिल्या होत्या. वेबसाइटवरील फोन नंबर डॉक्टरांच्या नंबरपेक्षा एक अंक वेगळा होता. रुग्णाच्या एका सत्रासाठी 3000 रुपये आकारले जात असून ते आगाऊ हस्तांतरित केल्याची मांगणी करण्यात येत होती. त्यासाठी अपॉइंटमेंट फुल्ल असल्याची कारणे रुग्णांना देण्यात आली.

सायबर पोलिसांचे आव्हान

सायबर पोलिसांनी मानसोपचातज्ज्ञ , डॉक्टर्स तसेच संबंधित रुग्णांना प्रत्येक अशी घटना घडल्यास प्रकरणाची तक्रार स्थानिक किंवा मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडे करण्याचे आव्हान केले आहे . जेणेकरून फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांची सोशल मीडियावरील बनावट खात्यांवर कारवाई त्वरित केली जाऊ शकते.

'जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आम्ही आमच्या सर्व रूग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सावधान करतो तसेच त्यांना आम्ही त्यांच्याशी कधीही अशा पद्धतीने पैशाची मागणी करणार नाही असे आश्वासन देतो तसेच अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये हा सल्ला देतो.'

- डॉ. अविनाश सूसा, माजी अध्यक्ष, बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटी

'मानसिक उपचार घेत असलेल्या रुग्णांना फसवणूक होण्याचा धोका जास्त असतो. त्यांचे त्यांच्या डॉक्टरांशीही खूप घट्ट नाते असते. त्यामुळे, जर त्यांना त्यांच्या डॉक्टरकडून असा मदत मागणारा संदेश मिळाला तर रुग्णांना ते खरे वाटते आणि ते त्यांना मदत करू इच्छितात.'

- डॉ हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

सामान्य जीवनात आपण अनोळखी व्यक्तीशी पडताळणी करून त्याच्याशी व्यवहार करतो तसेच इंटरनेट युजर्सने अनोळखी लिंक किंवा मेसेज वर पडताळणी केल्याशिवाय क्लिक करू नये. सायबर गुन्हेगारी करणारी गुन्हेगार हे वेगवेगळ्या स्वरूपात गुन्हेगारी करत असतात कधी ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाने कधी ऑनलाईन वीज भरण्याच्या नावाने जसे त्यांचे रूप बदलते तसेच इंटरनेट युजर्सने आपल्या मानसिकतेत सुद्धा फरक आणला पाहिजे आणि पडताळणी केल्या शिवाय अनोळखी लिंक अथवा मेसेजला उत्तर देऊ नये.

- हेमराज राजपूत पोलीस उपायुक्त, सायबर क्राईम, मुंबई पोलीस