
त्या ठेकेदाराला 25 हजाराचा दंड; पालिकेची दंडात्मक कारवाई
डोंबिवली - पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतील नाल्यांची साफ सफाई व गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या नालेसफाईच्या कामात हातसफाई होत असून नाल्यातील गाळ नाल्यातच टाकून ठेकेदार कामात चालढकल करत असल्याची बाब व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती. याप्रकरणी ई सकाळवर वृत्त प्रसारीत झाल्यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील नालेसफाईच्या कामात ठेकेदार चालढकल करीत असल्याचा व्हिडीओ मनसेचे पदाधिकारी कपिल पवार यांनी समाज माध्यमावर व्हायरल केला होता. नाले सफाई करणारे कामगार नाल्यातील गाळ एका बाजूला काढून दुसऱ्या बाजूला नाल्यातच टाकत असल्याचाबाब या व्हिडीओतून समोर आली होती. याविषयीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेत संबंधित ठेकेदारावर 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ म्हणाले, नालेसफाई कामाचा व्हिडीओ आणि त्यासंबंधीची बातमी समजल्यानंतर उपायुक्तांसह स्वतः प्रत्यक्षात जाऊन कामाची पहाणी केली. कामगार घरी जात असताना त्यांनी असा प्रकार केल्याचे समजले. तसेच त्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा सुपरवायझर स्टाफ देखील त्यावेळी उपलब्ध नव्हता. त्यामुळे कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर 25 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून वसुल केला जाणार आहे.
Web Title: Punitive Action Of Municipality Cleaning And Sludge Of Drains Contractor Fined Rs 25000 Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..