esakal | मेहुल चोक्सीची उच्च न्यायालयात धाव; पुढील आठवड्यात सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

PNB fraud accused Mehul Choksis Gitanjali Gems 8 other firms cant trade in shares

पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीने सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

मेहुल चोक्सीची उच्च न्यायालयात धाव; पुढील आठवड्यात सुनावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीने सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयाने चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. तसेच त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया ईडीने सुरू केली आहे. ईडिच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी चोक्सीने याचिकेद्वारे केली आहे. आज न्या रेवती मोहिते डेरे यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या वतीने याचिकेला विरोध करणारा अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप याचिकादाराने याचिका दिलेली नाही, असे ईडिकडून सांगण्यात आले. न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली आणि सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.

चोक्सीला आतापर्यंत अनेकदा ईडीने अजामीनपात्र समन्स बजावत चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र तो हजर झाला नाही आणि परदेशात फरार झाला असा दावा ईडीने केला आहे. ईडिच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली आहे. मात्र तूर्तास हा दिलासा देण्यासाठी न्यायालयाने नकार दिला.

हेही वाचा: मोठी बातमी! परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

चोक्सी आणि त्याचा निकटवर्तीय हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यावर सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा पीएनबी बैक घोटाळ्याचा आरोप आहे. दोघेही फरार असून ईडीने त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. चोक्सीला परदेशामध्ये अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याची जामिनावर सुटका झाली आहे. ऐटिंग्वामध्ये तो सध्या असून सुरक्षेच्या कारणास्तव भारतात परत येण्यास यापूर्वी नकार दिला होता. भारतीय तपास यंत्रणेवरही त्याने गंभीर आरोप केले आहेत.

loading image