दुकानांबाहेर मास्कच्या दराचा बोर्ड लावा, अन्न आणि औषध प्रशासनाकडून 171 जणांना नोटीस

भाग्यश्री भुवड
Friday, 27 November 2020

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दुकानाबाहेर मास्क दर पत्रक लिहिणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे दुकानदारांना सूचित करण्यात आले. दरम्यान असे दर पत्रक न लावलेल्या 171 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई: सरकारने मास्क दर ठरवून दिले असताना ही किंमतीपेक्षा जादा दराने मास्कची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दुकानाबाहेर मास्क दर पत्रक लिहिणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे दुकानदारांना सूचित करण्यात आले. दरम्यान असे दर पत्रक न लावलेल्या 171 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोना काळात सर्वसामान्यांच्या तक्रारी ध्यानात घेऊन मास्क दर निश्चित करण्यात आले. मात्र तरीही मास्क दर वाढवून सांगून विक्री होत असल्याच्या तक्रारी एफडीएला प्राप्त होत होत्या. यावर एफडीएच्या नव्या आयुक्तांनी दुकानाबाहेर मास्कच्या किंमती लिहिणे बंधनकारक केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले.

मास्कच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने मास्क तीन, चार, बारा, एकोणीस, पंचवीस, एकोणतीस आणि 127 रुपये असे दर ठरवले. मात्र कोरोना महामारीत मास्क वापरण्याच्या सक्तीचा गैरफायदा घेत दुकानदार कोणतेही मास्क अव्वाच्या सव्वा किंमतीत विकत होते. त्यामुळे एफडीएने राज्यात धडक कारवाई सुरू केली. राज्यात 3 हजार 398 औषध विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात 167 विक्रेत्यांनी मास्क चढ्या दराने विक्री केल्याचे निदर्शनास आले. नियमांचे उल्लंघन करून गंभीर स्वरुपाचा गैरप्रकार करणारे 172 जण आढळले. त्यातील 171 जणांना एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विक्रेत्यांना ठरविक मुदतीत खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास परवाना निलंबित तसेच रद्द करण्याची कारवाई होणार असल्याचे एफडीए कडून सांगण्यात आले.

अधिक वाचा-  चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार
 

सरकारच्या मास्क दर निश्चित समितीने मास्क दर निश्चित करून ही जादा किंमतीत मास्क विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे दुकानदारांना मास्क दर पत्रक दुकानांबाहेर लावण्यास सूचित करण्यात येत होते. जादा दराने मास्क विक्री झाल्यास कारवाई करण्यात येईल. 

अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

एफडीएची तपासणी मोहीम

शहर तपासणी नोटीस
     
मुंबई 614 36
कोकण 1197 35
पुणे 597 65
नाशिक 578 29
औरंगाबाद 564 0
अमरावती 265 6
नागपूर 123 1
एकूण  3938 171

 

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Put up rate board of masks outside shops notice 171 people from Food and Drug Administration


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put up rate board of masks outside shops notice 171 people from Food and Drug Administration