आता जहाजावर केले जाणार क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोनाशी सामना करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट सज्ज 

मुंबई : कोरोना विषाणूंशी सामना करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण व संशयितांना क्वारंटाईन सुविधा देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने तीन इमारती उपलब्ध करून दिल्या आहेत. या इमारतीत एक हजार रुग्णांना क्वारंटाईन करता येईल, तर तसेच दोन हजार लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जहाज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा...अमृतांजन पूल पाडण्यास सुरुवात 

एकूण तीन हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची सुविधा मुंबई पोर्ट ट्रस्टने केली आहे. आता ही सुविधा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमध्ये उपलब्ध आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना व संशयितांना ठेवण्यासाठी समुद्रातील जहाजांचा वापर करण्यात येणार आहे. वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. येथे 100 खाटा उपलब्ध असून 90 टक्के वापर कोरोनाबाधित व संशयितांसाठी सज्ज ठेवला आहे. कोरोना रुग्ण व इतर रुग्णांचा एकमेकांशी संबंध येऊ नये यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार, स्वतंत्र अतिदक्षता विभाग, स्वतंत्र वॉर्ड वापरले जाईल. प्रवेशद्वाराजवळ स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. 
पोर्ट ट्रस्ट रुग्णालयातील धन्वंतरी इमारत, नाडकर्णी पार्क वेल्फेअर सेंटर, सीएमसी इमारतीत संशयितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. वाडी बंदर येथे सेलर्स होममध्ये 500 रुग्णांसाठी सुविधा पुरविण्याची चर्चा सुरू असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. 

हेही वाचा... आठ हजार पोलिसांचे सुटीसाठी अर्ज 

कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात पीपीटी कीटसह इतर सुविधा सज्ज आहेत. कोरोनाचे रुग्ण व संशयित यांच्यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे. तसेच अतिदक्षता विभागही वेगळा ठेवला आहे. तसेच सात नवीन व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. 
- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine will now be done on the ship