समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी लवकरच रॅक स्क्रिन बसवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी लवकरच रॅक स्क्रिन बसवणार

या प्रस्तावासाठी 'कोस्टल झोल मॅनेजमेंट अथॉरिटी'कडून 'कोस्टल रेग्युलेशन झोन'ची मंजूरी ही मिळाली आहे. पालिकेच्या वरळीतील लव्हग्रोव्ह स्टॉर्मवॉटर पंपिंग स्टेशनला ही प्रणाली जोडण्याचे विचाराधीन आहे. 

समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी लवकरच रॅक स्क्रिन बसवणार

मुंबई: सांडपाण्यातील कचरा थेट समुद्रात जाऊ नये यासाठी मेकॅनिकल रॅक स्क्रिन बसवण्यात येणार आहेत. नाल्यातील कचरा आणि तरंगणाऱ्या वस्तू समुद्रात जाण्याआधी बाहेर फेकल्या जातील. या प्रस्तावासाठी 'कोस्टल झोल मॅनेजमेंट अथॉरिटी'कडून 'कोस्टल रेग्युलेशन झोन'ची मंजूरी ही मिळाली आहे. पालिकेच्या वरळीतील लव्हग्रोव्ह स्टॉर्मवॉटर पंपिंग स्टेशनला ही प्रणाली जोडण्याचे विचाराधीन आहे. 

सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी थेट समुद्रात सोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई पालिकेला 29.75 कोटी रूपयांचा दंड ठोठावला. मुंबईत अशी 85 ठिकाण असून यामुळे समुद्र तसेच पर्यावरणाचे नुकसान होतेय. त्याची भरपाई म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला 4.25 कोटी रूपये भरण्याचे आदेश ही लवादाने दिले. तसेच दुषित पाण्यातून निघणाऱ्या विषारी द्रव्यांमुळे जे जैवविविधतेचे नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून प्रत्येक स्त्रोतानुसार 5 लाख रूपये कापले जाणार असून पालिकेला हा सर्व दंड एकत्रितपणे एका महिन्याच्या आत भरण्यास सांगण्यात आले. 

मुंबईत भांडूप, घाटकोपर, वर्सोवा, मालाड, कुलाबा, वरळी आणि वांद्रे असे 7 मल उदंचन केंद्र आहेत. मात्र तेथील व्यवस्था ही 17 वर्ष जुनी आहे. वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी याविरोधात राष्ट्रीय हरीत लवादाकडे तक्रार दाखल केली होती. शहरातील सांडपाणी 186 ठिकाणांहून समुद्रात सोडलं जातं. मात्र यातील 85 मोठी ठिकाणं अशी आहेत जेथे प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते समुद्रात सोडलं जातंय. याची दखल घेऊन हरित लवादाने पालिकेला दंड ठोठावला होता. यानंतर खडबढून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने हे प्रदूषण रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेकॅनिकल रॅक स्क्रिनचा उपयोग पावसाळ्यात अधिक होणार आहे. या स्क्रिनच्या मदतीने पावसाळ्यात पंपिंग स्टेशनमध्ये कचरा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गाळ साचणार नाही. या विशिष्ट पंपिंग स्टेशनचा उपयोग दक्षिण मध्य मुंबईकडून पावसाळ्याच्या वेळी ज्यादा पाणी बाहेर काढण्यासाठी केला जातो. जो नंतर अरबी समुद्राकडे वळवला जातो. सध्या हा प्रस्ताव विचाराधिन असून तो मंजूर झाल्यास प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर ठिकाणी ही प्रणाली वापरण्याचे विचाराधिन असल्याचे कळते.

अधिक वाचा-  मुंबईत दिवाळीच्या खरेदीला ट्रॅफिक जामचा फटका

मुंबईत दिवसाला 2,200 ते 2,400 एमएलडी सांडपाणी निघते.  त्यातील 1,500 एमएलडी सांडपाण्यावर मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया केली जाते. हॉटेल्स तसेच काही मोठ्या सोसायट्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर काही खासगी मनसिस्सारण केंद्रात प्रक्रिया होते. मात्र आज ही 25 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडण्यात येत असल्याचे व्हिजेटीआयच्या अहवालात म्हटले आहे. यातून बराच कचरा समुद्रात जात असल्याने समुद्राचे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Rack screen will soon be installed prevent sewage from entering the sea

loading image
go to top