राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

तुषार सोनवणे
Sunday, 3 January 2021

युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

मुंबई : युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन दलित चेहरा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला एक सक्षम आणि कणखर आंबेडकरी युवा नेतृत्व दिलं असल्याच्या भावनाही युवकांमधून उमटू लागल्या आहेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल प्रधान हे मरावाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील अग्रणी नेते एस एम प्रधान यांचे चिरंजीव आहेत. राहुल प्रधान यांनी यापूर्वी युवा पँथरच्या माध्यमातून दलित युवकांना संघटित करण्यास सुरवात केली होती. आता ते समाज पार्टीच्या माध्यमातून दलित युवकांशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात मराठवाड्यातील नांदेडमधून झालेली आहे. मराठवाड्यात दलितांचे प्रश्न त्यांनी नेहमी आक्रमकपणे मांडले आहेत.

राज्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यानंतर नव्या दलित चेहऱ्याचा उदय झाला आहे. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी प्रधान यांना नियुक्ती पत्रक दिले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, राहुल प्रधान यांनी चंद्रशेखर आझाद यांचे आभार मानले असून त्यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भीम आझाद पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नुकतीच भीमा कोरेगावला भेट दिली होती. त्यांनी महाराष्ट्राचा तीन दिवसीय दौरा त्यावेळी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेतला. येणाऱ्या काळात उत्तरप्रदेशनंतर आझाद यांची महाराष्ट्रवर नजर राहणार आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकांकडे ते कसे पाहतात याची उत्त्सुकता आता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

Rahul Pradhan selected as Maharashtra State President of Azad Samaj Party 

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Pradhan selected as Maharashtra State President of Azad Samaj Party