माणगावात जनजीवन विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कोरोनाची भीती व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसे खबरदारी घेत असून, मुंबई-पुणे मार्गाने होणारी प्रवासी वाहतूक मंदावली आहे. दुसरा शनिवार-रविवार असतानाही नेहमीप्रमाणे महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी झाली असून, तुरळक वाहतूक सुरू होती.

माणगावः जगभरात कोरोनाची साथ वेगाने पसरत असताना ग्रामीण भागातही या साथीचा परिणाम दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत खबरदारीचे उपाय अवलंबले जात असून, माणगावातही या साथीमुले जनजीवन विस्कळित झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राणीची बाग सोमवारपासून बंद
 
कोरोनाची भीती व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसे खबरदारी घेत असून, मुंबई-पुणे मार्गाने होणारी प्रवासी वाहतूक मंदावली आहे. दुसरा शनिवार-रविवार असतानाही नेहमीप्रमाणे महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी झाली असून, तुरळक वाहतूक सुरू होती. साधारणपणे सुटीच्या दिवशी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते; मात्र गेले दोन दिवस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय व इतर खाद्यपदार्थ दुकानातूनही गर्दी कमी झाली आहे. जवळपास पन्नास ते साठ टक्के व्यवसाय कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तालुक्‍यात पहिल्यांदा चिकनचे दर 100 रुपयांच्या खाली आले असतानाही ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरविली असल्याने मोठ्या प्रमाणात चिकन व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. माणगाव एसटी बसस्थानकातही नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ नसून आवश्‍यकता असल्यासच नागरिक प्रवासाला पसंती देत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्‍यक त्या सूचना व खबरदारीचे उपाय प्रशासनाने घेतले आहेत. दरम्यान, माणगावातील बालरोगतज्ज्ञ व डॉक्‍टर्स यांनी सर्वसामान्यांनी खबरदारी घेऊन न घाबरता योग्य आहार विहार व योग, व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून खासगी संस्थांनी राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. एकंदरीत तालुक्‍यात कोरोनाच्या साथीच्या धर्तीवर प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिक खबरदारीचे उपाय घेताना दिसत आहेत. यामुळे वाहतूक, बाजारपेठ या ठिकाणी गर्दी कमी दिसत असून, सार्वजनिक व्यवहार मंदावले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून मुख्य माहामार्गावर वाहतूक कमी झाली आहे. याचा परिणाम पर्यटक संख्येवर झाला आहे. हॉटेल व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. जवळपास पन्नास टक्के व्यवसाय मंदावले आहेत. 
- सदानंद अधिकारी, हॉटेल व्यावसायिक, माणगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-corona-mangoan city

टॉपिकस