अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार- हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

खंडाळा घाट व द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात दुर्दैवी आहेत. यावर तातडीने सुधारणा होण्यासाठी राज्य सरकार, रस्ते विकास प्राधिकरणच्या माध्यमातून पुढाकार घेणार असून, तातडीने योग्य त्या सुधारणा होण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

खोपोलीः खंडाळा घाटातील खोपोली एक्‍झिट महामार्गावरील वळण रस्त्यावर भीषण अपघातात मंगळवारी पहाटे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार क्षेत्रातील जवळचे सहकारी रणबीर चव्हाण यांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ मंगळवारी खालापुरात आले होते. त्या वेळी अपघातांची वाढती संख्या, यामागील कारणे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्यासमोर मांडली. यावर सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे, असे आश्‍वासन मुश्रीफ यांनी दिले. 

खंडाळा घाट व द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात दुर्दैवी आहेत. यावर तातडीने सुधारणा होण्यासाठी राज्य सरकार, रस्ते विकास प्राधिकरणच्या माध्यमातून पुढाकार घेणार असून, तातडीने योग्य त्या सुधारणा होण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

संजय राऊत यांचे चक्रावून टाकणारे ट्विट, राऊत म्हणतात...
 
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसूरकर, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी विजय पाटील, खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक किशोर पानसरे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. या वेळी तहसीलदार इरेश चप्पलवार, खोपोली व खालापूर पोलिस ठाण्याचीे निरीक्षक यांनीही प्रशासकीय अडचणी व आवश्‍यक उपाययोजनांबाबत मुश्रीफ यांना माहिती दिली. 

खंडाळा घाट क्षेत्रात वनखात्याच्या नियमांचे बंधन आहे. पोलिस आणि महामार्गावरील यंत्रणांनी येथे गर्डर उभारले होते; मात्र कोणाच्याही नकळत ते हटवले जातात. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वन खाते यांनी ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे. 
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली 

अंडा पॉईंट, दस्तुरी वळण रस्ता व खोपोली एक्‍झिट येथील तीव्र उतार कमी होण्याची गरज आहे. त्याचबरोबर अतिजड वाहने व प्रवासी वाहनांना सायमाळ मार्गे खोपोलीकडे उतरण्यास बंदी घालावी. अपघातानंतर खोपोली पालिका रुग्णालयावर पडणारा ताण कमी करण्यासाठी परिसरात ट्रॉमा सेंटर उभारावे. 
- दत्ताजी मसूरकर, माजी नगराध्यक्ष, खोपोली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad hasan mushrif-road accident issue