
Raigad : हिंदूंसह ख्रिस्ती बांधवांची देवी ; रेवदंड्यातील माय-दे-देऊस माऊली
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी उत्सव, यात्रा, पालखी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची पारंपरिक प्रथा टिकून आहे. कुंडलिका खाडीवर वसलेले रेवदंडा हे गाव सुद्धा पोर्तुगीजांनी सत्ता गाजवलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते.
साधारण १५०५ मध्ये पोर्तुगीज चौरस (आजचे रेवदंडा) या ठिकाणी आले. मुसलमानांचा पाडाव करून येथे वर्चस्व स्थापित केले. १५१६ मध्ये अहमदनगरचा बुरहान निजामशहाने पोर्तुगीजांना वखार बांधण्यास परवानगी दिली.
१५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले आणि पौर्तुगीजांचा पराभव केला. बुरहानने पौर्तुगीजांशी मैत्री कायम ठेवली. या किल्ल्यात पौर्तुगिजांनी आठ चर्च बांधली. त्यापैकी माय-दे-देऊस माऊलीचे चर्च.
माय-दे-देऊस माऊली या देवीचा वार बुधवार आणि रविवार आहे. या भागातील हिंदू धर्मिय विविध सणाला येथे येतात. विशेष म्हणजे या देवीचा उत्सव साजरा केला जातो. तो उत्सव कोर्लईमधील (ता. मुरुड) ख्रिश्चन बांधव साजरा करतात. या उत्सवाला तिथी, वार नाही, तर ५ मे ही तारीख आहे.
५ मे अगोदर या चर्चमध्ये नऊ दिवस नवरात्रीसारखा उपक्रम राबवला जातो. ख्रिस्ती बांधव त्यात महिला कोर्लईमधून येऊन सायंकाळी गोळा स्टॉप (रेवदंडा) परिसरात असलेल्या मेणबत्ती लावून प्रार्थना करतात. मग ५ तारखेला देवीची पालखी रेवदंडा गावातील काही भागांत फिरवली जाते. त्यावेळी हिंदू धर्मिय श्रीफळ देऊन दर्शन घेतात.
या देवीला दरवर्षी मे अखेरीला कोर्लई गावात फिरवून कुठलीही रोगराई येऊ नये, पर्जन्यवृष्टी चांगली होऊ दे. संपूर्ण विश्वाला सुखशांती लाभू दे, असे साकडे घातले जाते. परिसरातील नागरिक हिला चमत्कार घडवणारी, रोगराई न आणून देणारी माऊली अशी ओळख आहे.
आख्यायिका
या देवीची आख्यायिका अशी आहे रेवदंडामधील एका मच्छीमाराला समुद्रात मासळी पकडताना जाळ्यांमध्ये देवीची मूर्ती सापडली. त्याने ती घरी आणली. तिची पूजा केली. रात्री देवीने स्वप्नात येऊन मच्छीमाराला दृष्टांत दिला आणि सांगितले मी ख्रिस्ती धर्मियांची देवता आहे. त्यामुळे मंदिरासमान चर्च बांधण्यास सांगितले. त्यानंतर हे चर्च बांधले गेले. चर्च कोणी व कधी बांधले, याबाबत माहिती उपलब्ध नसली, तरी सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे.