एसटी कर्मचारी फेस्टिव्हल ऍडव्हान्सपासून वंचित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

निधीची कमतरता असल्याने या वेळी गौरी गणपतीनिमित्त फेस्टिव्हल ऍडव्हान्स देता येणे शक्‍य नाही. 
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड 

अलिबाग ः गौरी, गणपतीचा सण साजरा करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल ऍडव्हान्स म्हणून पैसे दिले जातात; परंतु निधीअभावी जिल्ह्यातील 200 कर्मचारी या ऍडव्हान्सपासून वंचित आहेत. अर्ज करूनही ऍडव्हान्स न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 
कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून ईद, दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती सणानिमित्त पैशांच्या स्वरूपात प्रत्येकाला दहा हजार रुपये फेस्टिव्हल ऍडव्हान्स म्हणून दिले जातात. ज्या कर्मचाऱ्यांचे या ऍडव्हान्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांनाच हा निधी दिला जातो. शून्य टक्के व्याजावर रक्कम दिली जाते. त्यानंतर दर महिन्याला एक हजार रुपयेप्रमाणे पगारातून पैसे कापले जातात. 25 हजारपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच फेस्टिव्हल ऍडव्हान्स दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ऍडव्हान्स दिले जात आहे. 
या वर्षी गौरी गणपती सणानिमित्त फेस्टिव्हल ऍडव्हान्ससाठी अर्ज करण्याचे आवाहन विभागीय कार्यालयाकडून केले. 1 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आगार स्तरावर कर्मचाऱ्यांनी अर्ज केले. त्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयात पाठविला. रायगड विभागात अलिबाग, पेण, रोहा, महाड, माणगाव, कर्जत, मुरूड, श्रीवर्धन ही आठ आगारे आहेत. रायगडमधील आठ आगारांतील 200 कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. एकूण 20 लाख रुपयांचा निधी रायगडमधील कर्मचाऱ्यांना मिळणार होता; परंतु निधीच नसल्याने ऍडव्हास देणे थांबविले. त्याबाबत प्रत्येक आगारात विभागीय कार्यालयाकडून पत्रव्यवहार झाला. 

निधीची कमतरता असल्याने या वेळी गौरी गणपतीनिमित्त फेस्टिव्हल ऍडव्हान्स देता येणे शक्‍य नाही. 
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड 

आम्हाला फेस्टिव्हल ऍडव्हान्स दिले जाते. या वेळेला अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही ऍडव्हान्ससाठी अर्ज केले होते; परंतु निधी नसल्याचे कारण सांगून आम्हाला महामंडळाने अंधारात ठेवले आहे. पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. 
- एक एसटी कर्मचारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue