अश्रूंतून फुलला शेतीचा मळा! 

शेतीचा मळा
शेतीचा मळा

श्रीवर्धनः निसर्गाच्या प्रकोपामध्ये शेती पूर्णतः मातीला मिळाली. भाताला कोंब फुटले आणि होत्याचे नव्हते झाले; मात्र अशाही स्थितीत दांडगुरी येथील शेतकरी खचले नाही की सरकार आम्हाला मदत देईल, याच्या आशेवर राहिले नाहीत. त्यांनी नव्या उमेदीने भातखाचरांत उतरत शेतीचा मळा पुन्हा फुलविला. सुरुवातीला नुकसान पाहून डोळे अश्रूंनी भरले असले तरी आता त्याचे आनंदाश्रूमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांच्या या मेहनतीचे तालुक्‍यात कौतुक होत आहे.
 
तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे; परंतु संकटातही संधी असते या उक्तीनुसार नबाबकालीन निसर्गरम्य अशा दांडगुरी गावचे सरपंच गजानन पाटील व त्यांचे सहकारी सावंत यांनी या संकटातून संधी शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
 
उभी भातशेती परतीच्या पावसाने वाया गेली. संपूर्ण पीक हे शेतामधेच आडवे झाले. त्यामुळे वर्षभर केलेले कष्ट व झालेला संपूर्ण खर्च वाया गेला; परंतु त्यांनी धीर सोडला नाही. शेतात आडव्या झालेल्या भाताला शेतातील साचलेल्या पाण्यामुळे पुन्हा कोंब फुटले. याच कोंबातून पुन्हा कष्ट करण्याची ऊर्मी अंगात आली. दांडगुरी गावातून वाहणाऱ्या नदीला वनराईच्या माध्यमातून बंधारे बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा साठा या बंधाऱ्यामध्ये होत असतो. त्याचबरोबर गावातील काही शेतकऱ्यांनी सावराई मंदिराजवळ श्रमदानाने बंधारा बांधून पावसाचे पाणी अडवले आहे. या पाण्याचा उपयोग करून गजानन पाटील यांनी आपल्या शेतामध्ये वाया गेलेल्या व कोंब फुटलेल्या भाताची रोपे बनवून त्याच पिकातून दुबार पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वनराईकडून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात साठलेल्या पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेतली तर काही वेळेला पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे खरीपाच्या पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यास हातभार लागू शकतो. 

सरकार आपल्याला तत्परतेने मदत करेल, या आशेवर न राहता संकटामध्येही संधी शोधून निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे, त्याचा योग्य वापर करून व त्याला कष्टाची जोड देऊन दुबार पीक घेऊन आपले शिवार पुन्हा हिरवेगार करू शकतो. हेच यातून इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले. 
- गजानन पाटील, सरपंच तथा शेतकरी, दांडगुरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com