भिवपुरीत प्रवाशांचा जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

नेरळ ः मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड या उपनगरी स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु पादचारी पूल खुला न केल्यामुळे प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जातात. हा धोकादायक प्रकार रोखण्यासाठी पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे बांधावेत, अशा मागण्या प्रवासी संघटनेने केल्या आहेत.

नेरळ ः मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड या उपनगरी स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु पादचारी पूल खुला न केल्यामुळे प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जातात. हा धोकादायक प्रकार रोखण्यासाठी पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे बांधावेत, अशा मागण्या प्रवासी संघटनेने केल्या आहेत.

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात रूळ ओलांडताना अपघात होऊन अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पादचारी पुलाच्या मागणीसाठी प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली. हजारो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये कर्जत दिशेकडे पादचारी पूल मंजूर केला. या पादचारी पुलामुळे प्रवासी चार रेल्वेमार्ग ओलांडून जीव धोक्‍यात टाकणार नाहीत, असे नियोजन करण्याची सूचना भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने केली होती.

भिवपुरी स्थानकातील पादचारी पूल तयार होऊन किमान चार महिने झाले आहेत. परंतु मध्य रेल्वेने अद्याप हा पादचारी पूल खुला केलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेमार्ग ओलांडून जावे लागते. फलाट क्र. १ च्या बाहेर चिंचवली, उकरूळ, एकसळ, बार्डी आदी गावे आहेत. स्थानकात पादचारी पूल नसल्यामुळे हे प्रवासी रूळ ओलांडून जात असतात. फलाट क्र. २ च्या बाहेर डिकसळ, गारपोली, उमरोली, आषाणे, कोषाणे, वडवली, आसल या भागांतील रहिवाशांनाही लोकलने आल्यानंतर रूळ ओलांडावे लागतात.

कर्जत दिशेकडे रूळ ओलांडून प्रवासी जाऊ नयेत, यासाठी लोखंडी जाळ्या बसविण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रवासी संघटनांची मागणी डायमंड इमारतीपुढे करण्याची आहे. त्याच वेळी त्यांनी दोन्ही बाजूला लोखंडी ग्रील बसविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्याचे पत्र वरिष्ठ कार्यालयाला दिले आहे. परंतु लोखंडी ग्रील बसविण्याचे काम सुरू आहे.
- एस. के. यादव, अभियंता

मध्य रेल्वेने भिवपुरी रोड स्थानकातील पादचारी पूल खुला करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी जाळ्या लावाव्यात किंवा संरक्षक भिंत बांधावी. त्यामुळे कोणालाही रूळ ओलांडता येणार नाहीत.
- किशोर गायकवाड, अध्यक्ष, प्रवासी संघटना

दर महिन्याला अपघात होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक सुरक्षा रक्षक ठेवला पाहिजे. हा सुरक्षा रक्षक रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर गुन्हे नोंदवेल. रूळ ओलांडण्यापूर्वी विचार करावा लागेल.
- राजेश विरले, प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue