मुरूडमध्ये रुग्णांची फरपट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुरूड : मुरूड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्‍टरच नसल्याने रुग्णांची फरपट होत आहे. बाह्यरुग्ण विभाग रुग्णांसाठी बंद झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. 

मुरूड : मुरूड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्‍टरच नसल्याने रुग्णांची फरपट होत आहे. बाह्यरुग्ण विभाग रुग्णांसाठी बंद झाल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. 

मुरूड ग्रामीण रुग्णालयात ५ ऑक्‍टोबर २०१९ रोजी डॉ. सुमय्या शेख यांचा नियुक्ती कार्यकाळ संपला आहे. यापूर्वी नियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गंगलवार आणि डॉ. प्रतिमा चतरमल यांनीही अन्यत्र जाणे पसंत केले आहे. ३१ मार्च २०१९ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.  प्रवीण बागूल सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ अधीक्षकपदही भरण्यात आलेले नाही. त्यामुळे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये एक स्त्री-रोगतज्ज्ञ डॉक्‍टरसह ७ परिचारिकांच्या जागा लवकरात लवकर नियुक्त करण्याची मागणी होत आहे. 

२०१९ पासून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय आधिकाऱ्यांची पर्यायी नियुक्ती न केल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या रुग्णालयात  मुरूडसह लगतच्या १० ते १२ गावातून रुग्ण येत असतात. ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सक आहेत. मात्र दंतचिकित्सा करण्यासाठी डॉक्‍टरांना पुरेशा सुविधा नाहीत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी निर्णय घेऊन डॉक्‍टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुरूड ग्रामीण रुग्णालयात ५ ऑक्‍टोबरपासून डॉक्‍टरच नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी आरोग्य संचालनालयाने ग्रामीण रुग्णालयात प्राधान्याने डॉक्‍टर नियुक्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुरूडमधील मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली.

मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयासाठी दोन डॉक्‍टर मंजूर झालेले आहेत. यातील एक डॉक्‍टर आजारी पडल्याने ते हजर झालेले नाहीत; तर दुसरे डॉक्‍टर पनवेल येथील आहेत. कदाचित त्यांना येण्या-जाण्यास उशीर होत असावा. रुग्णांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

गोरगरीब विशेषतः हातावर पोट असलेले आदिवासी लोक खासगी डॉक्‍टरकडे १५० ते२०० रुपये फी देऊच शकत नाहीत. सरकारने त्यांचा विचार करावा.
- अरविंद गायकर, मुरूड

ग्रामीण रुग्णालयात प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे आलो; परंतु डॉक्‍टरच नसल्यामुळे परत जावे लागले. डॉक्‍टर कधी येतील, याबाबत कोणीच माहिती देत नाही. रुग्णालय प्रशासनाच्या चालढकल कारभारामुळे मनस्ताप झाला.
- पार्वतीबाई गायकर, ज्येष्ठ नागरिक, शिघ्रे

ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर नसल्यामुळे ओपीडीमध्ये शुकशुकाट आहे. गोरगरिबांना औषध व उपचार सरकारकडून मिळाले पाहिजेत, हीच अपेक्षा आहे.
- केतन सुरेश वर्तक, जंजिरा सायकल मार्ट, मुरूड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue