esakal | कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी सिडकोला

आंदोलनात पहिला खटला घ्यायला आपण तयार असून, कोणत्याही परिस्थितीत सिडकोला जागेची मोजणी करू देणार नाही...

कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळः कर्जत तालुक्‍यातील कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता; मात्र हा निर्णय कर्जत तालुक्‍यातील जनतेवर अन्याय करणारा असल्याने याविरोधात कोंढाणे धरण प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आंदोलनात पहिला खटला घ्यायला आपण तयार असून, कोणत्याही परिस्थितीत सिडकोला जागेची मोजणी करू देणार नाही, असा इशारा माजी आमदार आणि कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार सुरेश लाड यांनी दिला.
 
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कर्जतचे माजी आमदार आणि कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक, माजी आमदार सुरेश लाड यांच्या आवाहनानुसार खांडपे येथील गीता घारे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवारी (ता. 1) बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, सरपंच प्रभावती लोभी, माजी सरपंच मधुकर घारे, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
सुरुवातीला तानाजी चव्हाण यांनी प्रस्तावना करताना कोंढाणे धरणाची पार्श्‍वभूमी सांगून कोणत्याही स्थितीत धरण सिडकोला दिले जाऊ नये यासाठी आंदोलन उभे केले जाणार असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सुनील गायकवाड यांनी आपल्या परिसरात आधीच पाणीटंचाई असते; परंतु कातळदरा भागातील पाणी येथून वाहत जात असल्याने आम्ही नदीमध्ये पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी तरी बघतो; मात्र सिडकोला धरण विकले तर नदी पूर्णपणे बंद होईल, अशी भीती व्यक्त केली.

तुमच्या घरासमोर अचानक वाघ, सिंह अवतरला तर..
 
माजी आमदार सुरेश लाड म्हणाले, आमदार असताना नवी मुंबईसाठी चावणी येथे धरण व्हावे यासाठी आग्रही होतो; परंतु त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. कोंढाणे येथील धरण ही कर्जत तालुक्‍याची गरज असून, कर्जत तालुक्‍यात होत असलेल्या नवीन वसाहती आणि स्थानिक यांच्यासाठी ही गरज असून, त्या मागणीसाठी आता आपण या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटून कोंढाणे धरणाची गरज तालुक्‍यासाठी लक्षात घेऊन धरण सिडकोला देऊ नये आणि सरकारने धरण सिडकोला देण्याचा निर्णय रद्द करावा. यापुढे सरकारने निर्णय जाहीर करेपर्यंत सिडकोचा एकही अधिकारी धरण परिसरात मोजणी करण्यासाठी दिसल्यास कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल; पण आपण मोजणी होऊ देणार नाही. त्याचवेळी यापुढे कोंढाणे धरण कर्जत तालुक्‍यासाठी झाले पाहिजे आणि ते दुसऱ्यांसाठी नसेल असेल तर आपण आघाडीवर राहून आंदोलन करू. 


आम्ही मातीचे बंधारे बांधतो म्हणून आता नदीमध्ये पाणी तरी दिसत आहे; पण मोरबे धरणाच्या खाली असलेली चौकच्या नदीमध्ये पाण्याचा थेंब दिसत नाही. अशी अवस्था आपल्या उल्हास नदीची करायची नाही आणि त्यासाठी आंदोलन करावे लागेल. सिडकोने काहीही करायचा निर्णय घेतला तरी आम्ही धरणाचे पाणी जाऊ देणार नाही. 
- सुधाकर घारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 
 

loading image
go to top