फार्महाऊसधारकांना प्रवेशबंदी करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

मांस, मच्छी, दारू आदी छोटे-मोठे साहित्य खरेदीसाठी फार्महाऊस परिसरातील आजूबाजूच्या गावात फिरतात. यातील एका कोणाला जरी कोरोनाची लागण झाली असेल तर या परिसरातील, गावातील लोकांमध्ये त्यांचा संसर्ग होऊन भयानक परिस्थिती ओढवू शकते.

कर्जतः राज्यातील सर्वाधिक फार्महाऊस कर्जत, खालापूर परिसरात आहेत. यातील बहुतेक फार्म हाऊस मुंबई, दिल्ली, पुणे आदी मोठ्या शहरांतील धनिकांचे आहेत. विशेष करून वीकेंडला ते मोठ्या प्रमाणात येतात. साहजिकच त्यांचा येथील बाजारपेठेत वावर होतो. ग्रामस्थांशी संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग त्यातून पसरण्याची दाट शक्‍यता असल्याने या फार्म हाऊसधारकांना खबरदारीचा उपाय म्हणून 30 मार्चपर्यंत तालुक्‍यातील फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्यास बंदी करावी, अशी मागणी बारणे येथील शिवसेनेचे युवासेना शाखाधिकारी नील मुने यांनी सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांकडे केली आहे.

करोनाची एसटी प्रवाशांना धास्ती
 
तालुका परिसरात अनेक उद्योगपती, राजकीय नेते मंडळी, कलाकार मंडळी, साहित्यिक आदींचे फार्म हाऊस आहेत. आठवडाभराचा क्षीण घालविण्यासाठी ते शनिवार, रविवार वीकेण्डला आपल्या फार्महाऊसवर येतात. खाणे, पिणे तसेच स्वीमिंग करणे हा त्यांचा शौक. साहजिकच ते आल्यावर मांस, मच्छी, दारू आदी छोटे-मोठे साहित्य खरेदीसाठी फार्महाऊस परिसरातील आजूबाजूच्या गावात फिरतात. यातील एका कोणाला जरी कोरोनाची लागण झाली असेल तर या परिसरातील, गावातील लोकांमध्ये त्यांचा संसर्ग होऊन भयानक परिस्थिती ओढवू शकते. तरी या सर्व बाबींचाही गांभीर्याने विचार करून तात्पुरते का होईना या फार्महाऊसधारकांना विषाणूचा धोका टळेपर्यंत बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. या फार्महाऊसधारकांमध्ये परदेशातून येणाऱ्यांचीही संख्या आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका उद्‌भवणार नाही. सरकारच्या धोरणाला सहकार्य केले पाहिजे. 
- राजन पतंगे, फार्महाऊसधारक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-karjat-farm house-ban #corona

टॉपिकस