कोरोनाची एसटी प्रवाशांना धास्ती

कोरोना विषाणूच्या भीतीने अलिबाग एसटी आगारात तोंडाला मास लावून फिरणारे प्रवासी
कोरोना विषाणूच्या भीतीने अलिबाग एसटी आगारात तोंडाला मास लावून फिरणारे प्रवासी

अलिबाग : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांनी एसटीने प्रवास करणे टाळले आहे. प्रवासी घटल्याने त्यांचा जबरदस्त फटका एसटी महामंडळाला बसला आहे. कोरोनामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, बोरिवली अशा अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांबरोबरच स्थानिक फेऱ्याही रायगड एसटी विभागाने बंद केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 104 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाचे सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न घटले आहे. 

रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, पेण, कर्जत असे आठ एसटी बस आगार आहेत. या आगारांमध्ये 512 एसटी बसेस आहेत. त्यात शिवशाही 40, निमआराम 60, साधी 410, मिडी 2, बसेसचा समावेश आहे. रायगड विभाग नियंत्रकांच्या अखत्यारीत येणाऱ्या आठ आगारात 601 चालक , 704 वाहने, तसेच चालक तथा वाहक 344 असे एकूण 1 हजार 649 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण 647 मार्ग असून 2 हजार 900 फेऱ्यांची संख्या आहे. सुमारे एक लाख 30 हजार किलोमीटर अंतरावर एसटी बसेस दरदिवशी धावत असतात. त्यामुळे दिवसाला प्रशासनाला एसटीद्वारे सुमारे 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. अनेक जण तोंडाला मास्क लावून प्रवास करीत आहेत. 

कोरोना विषाणूची धास्ती एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीदेखील घेतली आहे. एसटीतून प्रवास करणे प्रवाशांनी टाळल्याने एसटी सेवेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मुंबई - पुणे व अन्य लांब पल्ल्यांच्या अन्य ठिकाणी भरगच्च जाणारी एसटी मोजक्‍याच प्रवाशांनी घेऊन ये-जा करीत आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. प्रवासी नसल्याने एसटी महामंडळाला अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ आली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, बोरिवली अशा अनेक लांब पल्ल्याबरोबरच स्थानिक फेऱ्याही रायगड एसटी विभागाने बंद केल्या आहेत. आतापर्यंत 104 फेऱ्या बंद केल्या असून तीन हजार 800 किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एसटीचे एक लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न घटले आहे. कोरोनामुळे 20 टक्के प्रवासी कमी झाल्याने एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

उत्पन्न वाढवा, अभियानाला फटका 
कमी गर्दीच्या हंगामात प्रवासी वाढविण्यासाठी सरकारने एसटी महामंडळासाठी 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत "उत्पन्न वाढवा' विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक आगारात चालक व वाहकांसह कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगाराला भारमान व किलोमीटरचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु कोरोनामुळे उत्पन्न वाढवा अभियानाला फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांनी एसटीतून प्रवासच करणे बंद केले आहे. 

शिवशाहीत सॅनिटायझरची सोय 
एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह चालक व वाहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था एसटी महामंडळाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शिवशाही एसटीतून प्रवास करणारे प्रवासी, चालक व वाहकांसाठीच ही सोय असणार आहे. 

कर्मचाऱ्यांना मास्कपुरवठा करणार 
जिल्ह्यात 8 एसटी बस आगार आहेत. या आगारांमध्ये आगार व्यवस्थापक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, मॅकेनिक, चालक व वाहक आदी कार्यरत असतात. त्यांचा प्रवाशांसोबत थेट संबंध येतो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा करण्यात येणार आहे. 

एसटीतील प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. कोरोना विषाणूमुळे प्रवाशांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात आले असून सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा तातडीने करण्यात येणार आहे. 
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com