रस्त्यासाठी धार नदीतून भरदिवसा पाणीउपसा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीचे पाणीउपसा थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबविण्यास सांगितले होते. वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे-कुरुंग मार्गावर असलेल्या धार नदीपात्रातून दोन-चार महिन्यांपासून महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू केला.

कर्जतः कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असून, या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून परिसरातील धार नदीतून मोठ्या प्रमाणात टॅंकरद्वारे पाणीउपसा सुरू होता; मात्र भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता स्थानिकांच्या मागणीनुसार कंपनीस पाणीउपसा थांबविण्यास सांगितले आहे; मात्र तरीही कंपनीने पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
 
महामार्गाच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. यासाठी ठेकेदार कंपनीकडून महामार्ग परिसरातील नैसर्गिक नदी-नाल्यांतून टॅंकरद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू आहे. त्यामुळे ज्या भागात पाण्यासाठी नदी-नाल्यांवर अवलंबून असलेल्या स्थानिकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा विचार करून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीचे पाणीउपसा थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबविण्यास सांगितले होते. वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे-कुरुंग मार्गावर असलेल्या धार नदीपात्रातून दोन-चार महिन्यांपासून महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू केला. परिणामी नदीपात्रात पाणीसाठा कमी होऊ लागेल.

या नदी परिसरातील आदिवासी बांधव या पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. भाजीपाला लागवड करून आपली उपजीविका करत आहेत. त्याचप्रमाणे वन्यप्राणी, गुरांना उन्हाळ्यात याच पाण्याचा आसरा आहे; मात्र टॅंकरद्वारे होत असलेल्या बेसुमार पाणीउपशामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार हे निश्‍चित, याची दखल घेऊन वारे ग्रामपंचायत सरपंच योगेश राणे, उपसरपंच नीलेश म्हसे, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी बैठक घेतली. भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून हा उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली; मात्र त्या नोटिसीला केराची टोपली दाखवत ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता राजरोस पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. संबधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

भिवंडी मेट्रो प्रकल्पात विरोधाचे सूर

रस्त्याच्या कामासाठी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील नदीतून होणाऱ्या पाणीउपशाने भविष्यात या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई जाणवू शकते. याचा विचार करता आम्ही ठेकेदार कंपनीस उपसा करण्यास रोखले आहे; मात्र तरीही पाणीउपसा होत असेल तर ग्रामस्थांसह जागेवर जाऊन नदीपात्रात जाणारा रस्ता बंद करावा लागेल. 
- योगेश राणे, सरपंच, ग्रामपंचायत वारे 

कर्जत-मुरबाड रस्त्याच्या कामासाठी होत असलेला पाणीउपसा लक्षात घेता भविष्यात या भागात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबवण्यास कळवले आहे; मात्र नोटीस देऊनही पाणीउपसा सुरू असल्याचे समजते. त्यावर कारवाई केली जाईल. 
- नीलेश म्हसे, उपसरपंच, वारे 

ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही संबंधित कंपनी मनमानी करत आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या नदीचे पात्र कोरडे पडणार. त्याचा परिणाम ग्रामस्थांसह वन्यप्राण्यांनाही भोगावा लागणार आहे. ग्रामपंचायतीने याविषयी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 
- महेश रामचंद्र म्हसे, ग्रामस्थ, वारे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-karjat-water problem