महाड आगाराचे वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

लक कमतरतेमुळे नवीन भरतीनंतर येथे 26 नवीन चालक देण्यात आले. त्यामुळे वेळापत्रक जमेल अशी स्थिती असतानाच 21 चालकांची अन्यत्र बदली केली. त्यामुळे महाडचे वेळापत्रक कोलमडले आहे.

महाडः वाहनचालकांच्या रिक्त पदांमुळे कोलमडलेल्या महाड एसटी आगारामध्ये 26 नवीन चालक रुजू झाल्याने कारभार सुरळीत होईल, अशी आशा प्रवाशांना होती; परंतु नवीन चालक रुजू झाल्यानंतर आगारातील 21 चालकांच्या बदल्या झाल्याने कारभार पुन्हा जैसे थे झाला आहे. महामंडळही याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याची स्थिती आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड आगार कोकण तसेच मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी मध्यवर्ती आगार मानले जाते. चालक व वाहक यांच्या कमतरतेमुळे आगारातील एसटी प्रवास अधिकच खड्ड्यात जाऊ लागला आहे. याचा मोठा परिणाम प्रवाशांवर तसेच एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. बसस्थानक जुने असल्याने रात्रंदिवस येथे बसची वर्दळ असते. ही गरज लक्षात घेऊन महामंडळाने येथे सध्या बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू केले आहे.

शिक्षक मारहाणप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटी

महाड आगारातून दररोज स्थानिक व लांब पल्ल्याच्या 405 फेऱ्या चालवल्या जातात. याकरिता 265 वाहक व 265 चालक अशा कर्मचाऱ्यांची गरज असते. याशिवाय काही अतिरिक्त चालक-वाहकही असावे लागतात. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवडा सुट्टी देणे शक्‍य होत असते; परंतु आगारात सद्यस्थितीत 226 चालक काम करत आहेत. चालक कमतरतेमुळे नवीन भरतीनंतर येथे 26 नवीन चालक देण्यात आले. त्यामुळे वेळापत्रक जमेल अशी स्थिती असतानाच 21 चालकांची अन्यत्र बदली केली. त्यामुळे महाडचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाड आगारातून यापूर्वीही काही वाहनचालकांच्या बदल्या झाल्या; परंतु या मोबदल्यात येथे चालक हजर झाले नाहीत. 

30 चालकांना अतिरिक्त काम 
सध्या काम करणाऱ्या 30 चालकांना अतिरिक्त काम करावे लागते. चालकांना अतिरिक्त काम करणे जोखमीचे असते. बसस्थानकामधून दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करतात. बाहेरील आगारांच्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबत असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह ग्रामीण भागामध्ये स्थानिक बससेवाही सुरू असते. कमी चालकांमुळे नियमित एसटी बस सोडल्या गेल्या नाहीत, तर प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळतील. याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसू शकतो. 

महाड आगारामध्ये नवीन चालक आले असले तरी काही चालकांची बदली झाल्याने चालकांची कमतरता आहे. यामुळे काहीवेळा चालकांना अतिरिक्त काम करावे लागते. तरीही नियोजन करून प्रवाशांना सुविधा दिल्या जात आहेत. 
- ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, महाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-mahad-st bus-problem