
कृषी कायद्यांविरोधात शेकापच्यावतीने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान ते राजभवन असा मोर्चा काढण्यात येणार
अलिबाग : कृषी व कामगार कायद्याविरोधात गेले अनेक दिवस शेतकरी आंदोलन करूनही हे कायदे अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आता या कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान ते राजभवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात रायगड जिल्ह्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी व कामगार कायदे शेतकरी व कामगारांसाठी अन्यायकारक असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब, हरयाना येथील लाखो शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेतकरी व काही शेतकरी संघटनाही सामील झाल्या आहेत; मात्र केंद्राकडून अद्याप सकारात्मक भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संताप निर्माण होत असल्याचे शेकाप जिल्हा चिटणीस ऍड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. त्यामुळे 25 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता, मुंबई येथील आझाद मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे मंजूर करून देशातील शेतकरी व कामगारांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा असून या कायद्याविरोधात शेकापच्या वतीने 25 जानेवारी रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.
- जयंत पाटील, आमदार,
राज्य सरचिटणीस, शेकाप
raigad marathi news shetakari kamagar paksh march on Raj Bhavan against Agriculture Bill farmers protest
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )